News

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार चिंतेत पडले आहे. विशेषत मुंबईत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे मुबंईमधील एपीएमसीची पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated on 08 May, 2020 5:58 PM IST


कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार चिंतेत पडले आहे. विशेषत मुंबईत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे मुबंईमधील एपीएमसीची पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. सोमवारपासून एका आठवड्यासाठी म्हणजे ११ ते १७ मे पर्यंत मार्केट पूर्णपणे बंद राहिल. कोकण आयुक्त, पोलीस, माथाडी नेते यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मार्केट बंद असणाऱ्या वेळेत व्यापारी, कामगारांची तपासणी केली जाणार आहे.

नवी मुंबईत गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे ३०० रुग्ण वाढले असून यात एपीएमसी बाजार आवारातील संसर्गाचे ७९ रुग्ण झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. येथून नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील रुग्ण वाढीबरोबर आता इतर जिल्ह्य़ातही संसर्ग पोहचत असल्याचे समोर आले आहे. वेंगुर्ले येथील हापूस वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे एपीएमसी बंदची मागणी होत होती. ‘क्लोज एपीएमसी, सेव्ह नवी मुंबई’ अशी मोहीम आता समाजमाध्यमांवर सुरू झाली होती. यानंतर प्रशासनाने मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन आठवडय़ांत एपीएमसीत कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. येथील रुग्णांमुळे नवी मुंबईतील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली आहे. गेल्या दहा दिवसांत नवी मुंबईत ३०० करोना रुग्ण झाले आहेत. एपीएमसीतील फळ बाजारात मंगळवारी वेंगुर्ले येथील आंब्याचा ट्रक घेऊन आलेल्या एका चालकाचीही कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांनी आता तेथून ही वाहतूक बंद केली आहे, अशी माहिती फळ व्यापाऱ्यांनी दिली.

English Summary: Apmc market completely close for one week
Published on: 08 May 2020, 05:20 IST