मुंबई: राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत घेण्यात येत असलेल्या ज्या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा प्राप्त नव्हता अशा बी.एस्सी. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदवी) आणि एम.एस्सी (कृषि) अंतर्गतच्या १० अभ्यासक्रमांना आता व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.
श्री. भुसे म्हणाले, कृषि व पदुम विभागाच्या १५ जुलै २०१७ च्या शासन निर्णयनुसार कृषि विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहेत. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत घेण्यात येत असलेल्या ज्या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा प्राप्त नाही अशा अभ्यासक्रमांना व्यावसायिक घोषित करण्याबाबत कृषि परिषद, पुणे कार्यालयाकडून प्राप्त प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सद्यस्थितीत बी.एस्सी. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदवी) आणि एम.एस्सी (कृषि) अंतर्गत १० अभ्यासक्रम हे व्यावसायिक घोषित नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती/शिष्यवृत्ती मिळत नव्हती.
या अनुषंगाने नियोजन आणि वित्त विभागाच्या मान्यतेने कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदवी आणि कृषि पदव्युत्तर पदवीचे एम.एस्सी.(कृषि), एम. एस्सी (वनशास्त्र), एम. एस्सी. (उद्यानविद्या), एम. एस्सी. (काढणी पश्चात व्यवस्थापन), एम.एफ.एस्सी. (मत्स्य विज्ञान), एम.एस्सी. (गृह विज्ञान), एम.एस्सी. (कृषि जैवतंत्रज्ञान), एम.टेक. (कृषि अभियांत्रिकी), एमबीए (कृषि) व एम.टेक.(कृषि अभियांत्रिकी), एमबीए (कृषि) व एम.टेक (अन्न तंत्रज्ञान) हे अभ्यासक्रम व्यावसयिक घोषित करण्याबाबत कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे कृषि विद्यापीठातील या शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती/शिष्यवृत्ती मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. या निर्णयामुळे २ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी निवेदनात सांगितले.
Published on: 06 March 2020, 12:25 IST