शेतीला जोड धंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करतात. पशुपालन मध्ये दुग्ध व्यवसाय, त्यासोबतच शेळीपालन तसेच कुक्कुटपालन हे व्यवसाय देखील केले जातात.
या व्यवसायामध्ये गती यावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून यासाठी योजना राबवली जात आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून सात लाख 98 हजार अर्ज पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झाले होते. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 18 फेब्रुवारी होती. यातील प्राप्त झालेल्या अर्ज मधून पहिल्या टप्प्यात 17 हजार 242 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनांसाठी शासनाकडून 102 कोटी 90 लाख रुपये एवढा भरीव निधी मिळालेला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या योजनेच्या माध्यमातून पशुपालन व्यवसायाला बळकटी मिळणार आहे.
जिल्हानिहाय योजनेचे स्वरूप
या योजनेच्या माध्यमातून शेळीपालनासाठी बीड, वाशिम,जालना,यवतमाळ, अहमदनगर,बुलढाणा, हिंगोली या जिल्ह्यांमधून सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत तर दुधाळ गाई म्हशींच्या योजनेत पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश नाही तर लातूर, बीड, नांदेड, जालना,परभणी,उस्मानाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाकडे दाखल झालेल्या अर्जामधून सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये सर्वाधिक अर्ज हे शेळीपालन अनुदान साठी आले होते. शेळी पालनासाठी आलेल्या अर्जांचा विचार केला तर तब्बल दोन लाख 64 हजार 55 अर्ज हे शेळीपालनासाठी तर गाई म्हशी घेण्यासाठी दोन लाख 20 हजार 80 तर कुक्कुटपालनासाठी 81 हजार 775 अर्ज दाखल झाले होते.
Published on: 17 February 2022, 12:35 IST