गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा निसर्गाच्या लहरीपणामुळे अक्षरशः हतबल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार होत असलेल्या नुकसानीला कंटाळून आता बळीराजा हंगामी पिकाकडे वळू लागला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे.
सध्या टरबुज या हंगामी पीकाला चांगला विक्रमी दर मिळत आहे यामुळे शेतकरी राजा समाधानी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र, औरंगाबाद मधील एक कलिंगड उत्पादक शेतकरी एका वेगळ्या कारणामुळे संकटात सापडला आहे. जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात अज्ञात माणसाने एका शेतकऱ्याच्या अडीच एकर टरबुज पिकावर कीटकनाशक फवारणी केल्याने सदर शेतकऱ्याचे सर्व पीक जळून खाक झाले आहे. यामुळे शेतकऱ्याला लाखों रुपयांचा फटका बसला आहे.
तालुक्यातील सुनील नरहरी गायकवाड या शेतकऱ्याने टरबुज पिकाची लागवड केली होती. यासाठी महागडे बियाणे त्यांनी पेरले होते. पिकाची योग्य जोपासना केली यामुळे त्यांना दर्जेदार उत्पादन प्राप्त होणार अशी आशा होती.
मात्र एका अज्ञात माणसाने रात्री टरबूज पिकावर कीटकनाशक फवारणी केल्यामुळे सुनील यांचे अडीच एकरावरील टरबूज पीक अक्षरशा जळून खाक झाले आहे. त्यामुळे सुनील यांचे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या संबंधित सुनील यांनी विरगाव पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे. विरगाव पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सुनील यांनी सांगितले की, खरीप हंगामात त्यांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे त्यांनी रब्बी हंगामात त्याची भरपाई काढण्यासाठी कलिंगड पिकाची लागवड केली होती.
कलिंगड पीक ऐन रमजान महिन्यात काढणीसाठी आले होते. यामुळे त्यांना अडीच एकर क्षेत्रातून पाच लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा होती. मात्र, नवनाथ गायकवाड आणि अभिषेक गायकवाड या दोन माणसांनी रात्री कीटकनाशक फवारल्यामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता दुरावला गेला आहे. सुनील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, त्यांनी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्यापही त्यांना अटक झालेली नाही. कीटक नाशक फवारल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानाची नुकसान भरपाई कोण देईल आणि त्यांच्या बँकेचे कर्ज कसे फिटेल.
Published on: 20 April 2022, 02:36 IST