कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातला हापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. पण, त्याला आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण १ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत तब्बल ५ हजार हापूसच्या पेट्या या रत्नागिरी जिल्ह्यातून राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये रवाना झाला आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही साखळी योजना तयार करण्यात आली आहे. आत्मा अर्थात अग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीने केलेल्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली आहे. प्रति डझन जवळपास ३५० रूपये असा दर सध्या हापूसला मिळत आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात साधारम १ लाख ८२ हेक्टर क्षेत्र आंब्याच्या लागवडीखाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते.
पंढरपूर, फलटण, सातारा, कराड, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या ठिकाणी या पेट्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान आंबे घेतल्यानंतर पैसे देखील थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच तालुक्यांमधून या पेट्या रवाना होताना दिसत आहे. शिवाय, हा आकडा दिवसेंदिवस वाढेल अशी देखील आशा आहे. मोठ्या बागायतदारांचे स्वताचे नेटवर्क असताना छोटे आंबा बागायतदार आणि शेतकरी यांना मात्र अनेक अडचणी येत होत्या. पण त्यांच्या मदतीला 'आत्मा' विभाग धावून आला आहे. लांबलेला पावसाळा, आणि त्यानंतर हमावानाचा लहरीपणा यामुळे आंबा उत्पादक संकटात होता. त्यामध्ये परत कोरोनाची भर पडली. मात्र आत्मा विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात देखील काही प्रमाणात का असेना दिलासा मिळताना दिसत आहे.
दुसरीकडे रत्नागिरी आणि देवगडचा हापूस सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. देवगडमधील आंबा व्यावसायिक प्रचंड अडचणीत आला आहे. आतापर्यंत फक्त १५ ते २० टक्के आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. तब्बल ८० टक्के आंबा अजूनही बागेत शिल्लक आहे. यावर्षी रत्नागिरी आणि देवगड हापूसला चांगला दर असूनही कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध होत नाही आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबई मार्केटमध्ये दाखल झालेल्या आंब्याला चांगला भाव होता. मात्र मार्चमध्ये लाॅकडाऊनमुळे आंबा बाजारात गेलाच नाही. दरवर्षी अडीचशे ते तीनशे कोटींची देवगड हापूसची उलाढाल होते. रत्नागिरी आणि देवगडमधील सर्व बागायतदार आंबा पाठवायचा कुठे ? या विवंचनेत आंबा बागायतदार आहेत. खरंतर देवगड आंबा हा जगप्रसिद्ध आहे. देश विदेशात याला खूपच मागणी आहे. पण सध्या देशांतर्गत व देशाबाहेरील वाहतूक सध्या बंद आहे. यामुळे परदेशात आंबा जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
Published on: 13 April 2020, 11:30 IST