मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. मराठा आंदोलक सत्ताधारी नेत्यांवर नाराज असून त्यांच्या विरोधात ठिकाठिकाणी आंदोलन करत आहेत. असाच विरोध रविकांत तुपकर यांनाही झाला. रविकांत तुपकर यांची लातूरच्या औसा येथे एका विश्रामगृहात बैठक सूरू असताना, मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांना घेरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली
रविकांत तुपकर चले जाव, रविकांत तुपकर परत जा, परत जा अशा घोषणा आंदोलक देत होते. आंदोलकांनी तुपकरांना मराठा आरक्षणाच काय झालं म्हणून जाबही विचारला. राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली असताना तुम्ही लातूरमध्ये आलाच कसे, असेही आंदोलकांनी तुपकर यांना विचारले. रविकांत तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
या घटनेसंर्दभात रविकांत तुपकर मराठा आंदोलकांना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उभारलेल्या प्रत्येक लढ्यात माझा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही नेहमीच आग्रही आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी मी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पाठिंबा दिला होता, तर माझी पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली होती.
मराठा आरक्षणासोबतच शेतमालाला रास्त भाव मिळावा ही मागणीसुद्धा तितकीच महत्वाची आहे. कारण बहुतांश मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे शोषण झाले म्हणूनच मराठा समाजाचा आर्थिक स्तर खाली गेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासोबतच सोयाबीन-कापसाला भाव मिळणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी माझा विदर्भ-मराठवाड्याचा दौरा सुरू आहे. त्या अनुषंगाने आज लातूर जिल्ह्याचा दौरा होता. मी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मी पूर्वी पासूनच अग्रभागी आहे. त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे रविकांत तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
Published on: 29 October 2023, 12:08 IST