नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने वाईन संबंधित एका वादग्रस्त निर्णयाला संमती दिली आहे. या निर्णयाअंतर्गत आता राज्यातील एक हजार स्केअर फुट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात तसेच सुपर मार्केटमध्ये सर्रासपणे वाईन विक्री केली जाणार आहे. ठाकरे सरकारने या निर्णयाचे कौतुक केले आहे मात्र विपक्षात असलेले भाजप ठाकरे सरकारच्या या निर्णयावर घणाघात करत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर गंभीर आरोप करीत ठाकरे सरकारने महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याच्या पार्श्वभूमीवर हा अनैतिक निर्णय घेतल्याचे टीकास्त्र सरकारवर सोडले आहे. राज्यात सर्वत्र वाईन-वाईनचा खेळ सुरू असतानाच डाळिंब उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात विशेष स्थान प्राप्त असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यातुन आता डाळिंबापासून वाईनं निर्मितीची परवानगी मायबाप सरकारने द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाशिक जिल्हा ज्याप्रमाणे द्राक्षे पंढरी म्हणून ओळखला जातो अगदी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कसमादे अर्थात कळवण सटाणा मालेगाव देवळा हा पट्टा डाळिंब उत्पादनासाठी डाळिंबाचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशात ख्यातीप्राप्त आहे. दरम्यान द्राक्ष उत्पादकांच्या तसेच वाईनरी चालकांनी द्राक्ष पासून निर्मित वाईन ही कुठलेच मद्य नाही तर अत्यल्प प्रमाणातच सेवन केल्यास आरोग्याला नानाविध फायदे मिळतात असे वक्तव्य केले आहे. त्यामुळेच डाळिंब देखील मानवी शरीराला अनेक अंगांनी उपयोगी आहे, याच्या सेवनाने मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते असा युक्तिवाद करत कसमादे पट्ट्यातील अर्थातच मौसम खोऱ्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब पासून वाईन निर्मितीची शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकरी सर्वस्वी डाळिंबाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत, येथील अनेक शेतकऱ्यांचा घरगाडा हा केवळ डाळिंब उत्पन्नाच्या जोरावरच हाकला जात आहे. मात्र परिसरातील या अतिमहत्त्वाच्या डाळिंब पिकाला अनेकदा मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. कधी अवकाळी अतिवृष्टी कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण या नैसर्गिक संकटांमुळे डाळिंबाच्या उत्पादनात घट होते शिवाय कधीकधी डाळिंबाला अगदी अत्यल्प दर प्राप्त होत असल्याने परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी पुरता बेजार होऊन जातो. डाळिंबाचे जरी यशस्वी उत्पादन घेतले जात असले तरी राज्यात अद्यापपर्यंत प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट बघायला मिळत नाही.
त्यामुळे डाळिंबाला अत्यल्प बाजार भाव मिळत असला तरी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आपला सोन्यासारखा माल नाईलाजाने विक्री करावा लागतो. त्यामुळे मायबाप सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्या आणि डाळिंबापासून वाईन निर्मितीची परवानगी द्यावी यामुळे निर्यात न होऊ शकणारा डाळिंब कवडीमोल दरात विकला न जाता त्याचा वाइन उद्योगात प्रभावीपणे वापर करता येईल आणि यापासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी थोडेफार पैसे पडतील, असे कसमादे पट्ट्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. डाळिंबामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे डाळिंबात अत्यल्प प्रमाणात का होईना अल्कोहोलचे प्रमाण अवश्य असणार असा युक्तिवाद करत डाळिंबावर प्रक्रिया करून डाळिंबाचा ज्यूस तसेच डाळिंबाची वाईन तयार करण्याची परवानगी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मागितली आहे.
Published on: 31 January 2022, 11:39 IST