Bhandara News : यावर्षीपासून नमो शेतकरी सन्मान महत्वाकांक्षी सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रक्कमेचे वाटप केले जात आहे. नुकसान भरपाईसाठी ४७ लाख ६३ हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली असून आतापर्यंत १ हजार ९५४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी पहिल्यांदाच १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, असं अजित पवार यांनी सांगितले आहे. भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शून्य टक्के व्याजाने पीककर्ज, पूरग्रस्तांना दुपटीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांनी धानासोबतच नगदी पिके देखील घेतली पाहिजेत. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी होती, ती पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढून महाविद्यालयाचे बांधकाम सुरु केले जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
पालकमंत्री डॉ. गावित यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून जिल्ह्यातील ५० ते ६० टक्के लाभार्थ्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ देण्यात आला असल्याचे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटनवाढीला संधी आहे. त्याला गती मिळणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती मिळावी, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. शासन आपल्या दारी अभियान कालावधीत जिल्ह्यात २ लाख ९ हजार ७५६ लाभार्थ्यांना विविध विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. देण्यात आलेल्या लाभाची रक्कम ३०४ कोटी रुपये इतकी आहे. एकट्या महसूल विभागाने या कालावधीत ९९ हजार दाखल्यांचे वितरण केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॅा.अमोल शिंदे यांनी शासन आपल्या दारी अभियानाची भूमिका व फलनिष्पत्ती याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागाचे स्टॅाल लावण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना निवेदन, तक्रार, म्हणणे सादर करता यावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने स्वतंत्र दालन लावण्यात आले. रोजगार मेळाव्यात अनेक युवकांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांना नाश्ता, पाणी, भोजन व प्रवासाची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने विनामूल्य करण्यात आली होती. कार्यक्रमास आलेल्या लाभार्थ्यांना प्रदर्शनस्थळी विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्तकोटी यांनी आभार मानले.
Published on: 21 November 2023, 11:24 IST