नवी दिल्ली: सर्व गावांना ग्रामनेटच्या माध्यमातून 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस वेगाने वाय-फाय जोडणी पुरवण्याच्या वचनबद्धतेचा सरकारने आज पुनरुच्चार केला. भारतनेट 1 जीबीपीएस कनेक्टिविटी पुरवण्याचे नियोजन करत असून, कनेक्टिविटीचा 10 जीबीपीएसपर्यंत विस्तार होऊ शकतो, असे दूरसंवाद राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितले. ते नवी दिल्ली येथे सी-डॉटच्या 36 व्या वर्धापनदिन समारंभात बोलत होते.
सी-डॉटच्या XGSPON चा यादृष्टीने मोठा उपयोग होणार आहे. स्वयंपूर्ण भारतीय गावाचे स्वप्न पाहिलेल्या महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी होत असताना, ही झेप त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे धोत्रे यांनी सांगितले.
सी-डॉटच्या XGSPON, C-Sat-Fi आणि CiSTB या नव्या उत्पादनांचा प्रारंभ आज झाला. सी-डॉटच्या सी-सॅट-फाय तंत्रज्ञानामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही मोबाईल फोनवर, फोन आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध होईल; ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या लोकांना याचा मोठा फायदा होईल, असे धोत्रे यांनी सांगितले.
Published on: 28 August 2019, 08:14 IST