मुंबई: राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व महाविद्यालये, विद्यापीठे दिनांक ३१ मार्च, २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३१ मार्चच्या अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली ग्रामीण व शहरी भागातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे तसेच परवानगी असलेले खाजगी क्लासेस बंद असणार आहेत. दिनांक २६, २७ दरम्यान राज्यातील कोरोनाबद्दलची परिस्थिती पाहण्यासाठी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. या नियमांचे सर्व महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.
वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी जाण्याची सुद्धा परवानगी देण्यात येत आहे. राज्यात शिक्षण घेणारे जे विद्यार्थी परदेशात गेले आहेत, त्यांना देशात परत येण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत. असे सांगून श्री. सामंत म्हणाले, विभागामार्फत पुढील अधिकृत सूचना येईपर्यंत कोणत्याही अफवांवर आणि माहितीवर विश्वास ठेऊ नये.
श्री. सामंत म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय कारणास्तव संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू/उपकुलगुरू/कुलसचिव/उपकुलसचिव तसेच महाविद्यालयाचे/तंत्रनिकेतनांचे प्राचार्य/संचालक/अधिष्ठाता यांनी निर्देश दिल्यास त्यानुसार अध्यापकांना संस्थेमध्ये तातडीने हजर राहणे बंधनकारक राहील. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू/उपकुलगुरू/कुलसचिव/उपकुलसचिव तसेच महाविद्यालयाचे/तंत्रनिकेतनांचे प्राचार्य/संचालक/अधिष्ठाता व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमितरित्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सर्व सरकारी/अनुदानित/खाजगी शैक्षणिक संस्था/महाविद्यालये/अकृषि विद्यापीठे/तंत्रशास्त्र विद्यापीठे/तंत्र निकेतने/अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/कला महाविद्यालये या मधील सर्व अध्यापक हे दि. २५ मार्च, २०२० पर्यंत घरी राहून कामकाज (Work from Home) करू शकतील, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
Published on: 17 March 2020, 08:19 IST