औरंगाबाद: मराठवाडा विभागात प्रशासकीय यंत्रणेमार्फत विविध विकास कामे अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. समृद्धी महामार्गासह इतर राष्ट्रीय महामार्ग, डीएमआयसी प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना, शेततळे, रेशीम विकास कार्यक्रम, तेरा कोटी वृक्ष लागवड अशा विविध विकास कामांचा समावेश आहे. विभागातील आठही जिल्ह्यात सुरू असलेली विविध विकासकामे मार्चअखेर पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी आज जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, परभणी जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, उस्मानबादचे जिल्हाधिकारी आर.व्ही.गमे, लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, औरंगाबाद जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जालना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, नांदेड जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, हिंगोली जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी.तुम्मोड, परभणी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज, उस्मानाबाद जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, बीड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, डॉ.विजयकुमार फड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा ठाकूर, उपायुक्त पी.एल.सोरमारे, उपायुक्त सरिता सुत्रावे, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, उपायुक्त विकास सूर्यकांत हजारे, उपायुक्त (पुरवठा) साधना सावरकर, यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सध्याची पीक परिस्थिती पर्जन्यमान आदींबाबत माहिती घेत डॉ. भापकर पुढे म्हणाले की, यावर्षी मराठवाड्यात पर्जन्यमान कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करुन त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करावा. शेतकऱ्यांना पीक विमा, बोंडअळीचे अनुदान, वेळीच वाटप करण्याबाबतच्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात. पीक आणेवारी काढण्यासाठी संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी. या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी यावेळी दिला.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद, तूर, आदी कडधान्य पिकांची लागवड करण्यात आली असून या पिकांची सद्यस्थिती बाबतची माहिती शासनाला ताबडतोब सादर करावी. कापसावरील बोंडअळी नियंत्रणासाठीच्या राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या संदर्भात कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन बोंडअळी नियंत्रणासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी विभागातील अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. उपलब्ध पाणी साठ्याचा नियोजनपूर्वक वापर करुन पाणी साठा राखीव ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची सद्यस्थिती आणि झालेली कामे तसेच दिलेले उद्दिष्ट यांची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.`मागेल त्याला शेततळे' योजनेच्या माध्यमातून प्रस्तावित महामार्गांच्या दोन्ही बाजूला शेततळ्यांची निर्मिती तसेच वृक्ष लागवडीचा मोठा उपक्रम हाती घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करावेत. शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी मंजूर करण्यात आलेली रक्कम वेळेत शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी. असेही यावेळी डॉ. भापकर यांनी सांगितले.
कल्पवृक्ष फळबाग लागवड कार्यक्रम, कृषी यांत्रिकीकरण, रेशीम व्यवसाय विकास कार्यक्रम, पीक पाहणी, पीक पेरा, गट शेती, 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदींबाबत माहिती घेऊन नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी राबविण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. रोजगार हमी योजना, सिंचन, स्वच्छ भारत मिशन, कौशल्य विकास कार्यक्रम, अन्नधान्य पुरवठा,राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, आरोग्य विभाग, गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिम यांसह शासकीय योजनांची माहिती गावागावात पोहचावी यासाठी राबविण्यात येणारा कॉलेज-नॉलेज-व्हिलेज उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्यातील प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम करुन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावे, सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी आपली जबाबदारी ओळखून काम केल्यास मराठवाडा विभागातील विकास कामांना खऱ्या अर्थाने गती देता येईल, अशी अपेक्षा करुन मराठवाडा विकासकामात अग्रेसर रहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी यावेळी केले.
Published on: 03 October 2018, 01:20 IST