News

सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ही पवित्र भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. ३५२ वर्षांपूर्वी जर शिवराज्याभिषेक झाला नसता, तर आज आपण इथे नसतो.

Updated on 11 June, 2025 11:38 AM IST

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आचार आदर्श मानून राज्य सरकारची वाटचाल सुरु आहॆ. पाचाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भव्य दिव्य शिवसृष्टी उभारली जाणार असून, त्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार ३५२ वा राज्याभिषेक दिन सोहळा आज जेष्ठ शुद्घ त्रयोदशीच्या दिवशी दुर्गराज रायगडवर मोठया उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, खा. श्रीरंग बारणे, . महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे,पोलीस अधीक्षक आचल दलाल,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, यांच्यासह कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष नितिन पावळे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवभक्त उपस्थित होते.

सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ही पवित्र भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. ३५२ वर्षांपूर्वी जर शिवराज्याभिषेक झाला नसता, तर आज आपण इथे नसतो. त्यांच्या दूरदृष्टी मुळे स्वराज्याचा पाया घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात, धर्म, वर्ण या पलीकडे जाऊन रयतेचे राज्य प्रस्थापित केले. त्यामुळे ते फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राष्ट्रनायक आहेत. पाकिस्तान बाबत जी भूमिका प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली आहॆ त्यामागे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचीच प्रेरणा आहॆ असेही त्यांनी सांगितले.

काळ कितीही पुढे गेला आणि आपण कितीही तंत्रज्ञानाच्या गोष्टी केल्या तरी शिवाजी महाराजांचा वारसा आपण कुणीच विसरू शकणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले राज्यशासनाने गडकोट किल्ले आणि मंदिरांचं जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहॆ.

छत्रपती महाराजांची, स्वराज्याची ओळख नव्याने करुन देण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन आपण पर्यटनाला चालना देतो आहॆ. त्यासाठी भारत गौरव यात्रेच्यामाध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनला आज हिरवा कंदील दाखवला असून या विशेष रेल्वे च्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि गडकोट पाहता येणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

English Summary: All possible assistance from the government for the creation of Shivsrushti Deputy Chief Minister Eknath Shinde assures
Published on: 11 June 2025, 11:38 IST