मुंबई: पशूपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशूपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जालना येथे 2 ते 4 फेब्रुवारीला अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पशु संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. संपूर्ण देशातील सुमारे 2 हजार वेगवेगळ्या जातीच्या पशुधनाचे एकत्रीत प्रदर्शन असणार आहे.
श्री. खोतकर पुढे म्हणाले, या प्रदर्शनामध्ये आपल्या राज्यातील तसेच अन्य राज्यातील उत्तमोत्तम आणि जास्त दूध देणाऱ्या जातीच्या गायी व म्हशी तसेच शेती व ओढ कामासाठी अतिशय चांगली व उपयुक्त असलेले बैल, विविध जातींचे अश्व, वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या राज्यातील शेळ्या व मेंढ्या, परस कुक्कुटपालन व व्यावसायिक कुक्कुटपालन यासाठी उपयुक्त असलेल्या वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्या, व्यावसायिक वराह पालनासाठी उपयुक्त असलेले विदेशी व संकरीत जातींचे वराह, वेगवेगळ्या जातींची कुत्री अशा सर्व प्रकारच्या पशूधनाचा प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहे. जातिवंत घोड्यापासून ते सश्यापर्यंत सर्व पशूधन या प्रदर्शनात असणार आहेत. सुलतान, युवराज यासारख्या कोटी कोटी रुपये किंमतीच्या रेड्यांचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे. जवळपासच्या बाहेरील राज्यातील 1 हजार पशूधन सहभागी होणे अपेक्षित आहेत. 3 दिवसांच्या प्रदर्शनाला दररोज किमान 50 हजार प्रेक्षक, शेतकरी व पशूपालक भेट देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रदर्शामध्ये पशूपालन व्यवसाय करताना, आवश्यक असलेली विविध उपकरणे, वेगवेगळ्या प्रकारची उपयुक्त औषधे आणि लसी, चारा व वैरणीचे उत्पादन वाढविण्यासाठी उत्तम प्रकारचे बियाणे/गवताचे ठोंब, हिरवा तसेच वाळलेला चारा साठवून ठेवण्याच्या पद्धतीची माहिती मिळणार आहे. चारा टंचाईचा मुकाबला करण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान, दुग्धोत्पादन व्यवसाय किफायतशीरपणे करण्यासाठी मुक्त संचार, गोठा तसेच मिल्क पार्लर व स्वच्छ दूध उत्पादन-जंतू विरहित दूध उत्पादन तंत्रज्ञान एकत्रीत बघायला मिळणार आहे. आधुनिक पद्धतीचे शेळी-मेंढी पालन या विषयांची माहितीसह नव्या बियाणे, व इतर निविष्ठा विविध कंपन्यांच्या स्टॉल्समधून उपलब्ध होणार आहेत.
प्रदर्शन स्थळावर प्रेक्षकांची नोंदणी करण्यासाठी पुरेशा संख्येने नोंदणी काऊंटर्स उपलब्ध राहतील. प्रेक्षकांनी या काऊंटरवर त्यांची माहिती विहित अर्जामध्ये भरुन दिल्यानंतर त्यांना नोंदणी क्रमांक व आवश्यक ओळखपत्र देण्यात येईल. त्यानंतर त्यांना प्रदर्शामध्ये सहभागी होता येईल. ऑनलाईन नोंदणी करण्याची देखील सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्यातील तसेच राज्याबाहेरुनही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक शेतकरी आणि पशूपालक प्रदर्शनस्थळाला भेट देणार आहेत. हे प्रदर्शन यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी श्री. खोतकर यांनी केले.
पशू-पक्षी प्रदर्शन ठळक मुद्दे:
- एकाच छत्राखाली शेतकरी आणि पशुपालकांना उत्तम जातीचे पशूधन
- पशू उत्पादन घेण्याच्या आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींची माहिती
- आवश्यक निविष्ठा उपलब्ध
- राष्ट्रीय स्तरावरील राज्यात पहिलेच प्रदर्शन
- चर्चासत्रांच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन
- विदर्भ-मराठवाडा भागात धवलक्रांतीच्या कक्षा अधिक व्यापक करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर
- राज्यांतील पशुधनाच्या उच्च वंशावळीच्या विविध जाती या प्रदर्शनात
- आदर्श गाव (मॉडेल व्हिलेज) या संकल्पनेवर आधारित गावाची निर्मिती या प्रदर्शनात
- प्रामुख्याने गीर, साहिवाल, थारपारकर, राठी व वेचूर या अधिक दूध देणाऱ्या देशी गायी प्रदर्शनाचे आकर्षण
- पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसह दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, ससेपालन, बटेरपालन आदी पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसाय याविषयी मार्गदर्शन.
Published on: 08 January 2019, 09:25 IST