गेल्या वर्षी शेतकऱ्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागले होते, कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी (Sometimes heavy rains and sometimes untimely rain) या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना लाखों रुपयांच्या नुकसानीचे चटके सहन करावे लागले होते. अशीच काहीशी परिस्थिती अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्यासाठी शासनदरबारीं दखल घेण्यात आली होती, आणि येथील पात्र शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत जवळपास 83 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच माहिती जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे, असं देखील यावेळी अधिकाऱ्यांनी नमूद केले. हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते आणि संबंधित शेतकऱ्यांना यासाठी मदत जाहीर झाली आहे. यापैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसानीची रक्कम खात्यात वितरित करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला, खरीप हंगामात आधी दुष्काळसदृश्य (Drought-like Situation) परिस्थिती बघायला मिळाली होती, मात्र नंतर अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, खरीप हंगामात शेतकऱ्यांना कवडीचेही उत्पन्न प्राप्त झाले नाही. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील उभे पिक अतिवृष्टीमुळे मातीमोल झाले. कापुस सोयाबीन या जिल्ह्यातील मुख्य पिकासमवेतच मूग आणि उडीद या पिकावरही अतिवृष्टी काळ बनून बरसला. शेतात उभे असलेले पिक पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचे बघायला मिळाले होते. जून ते सप्टेंबर या काळात अतिमुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनामार्फत (Through administration) पाहणी करण्यात आली आणि त्यानुसार संबंधित परिसरातील शेतकऱ्यांना निधीचे वाटप करण्यात येत असल्याचे प्रशासनाद्वारे सांगितले गेले आहे.
एकाच महिन्यात हजारो हेक्टरवरील पिक मातीमोल
जुलै महिन्यात पावसाचे विकराळ रूप जिल्ह्यात बघायला मिळाले परिस्थिती एवढी भयावय होती की फक्त जुलै महिन्यातच जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिक मातीत मिळाले. याचीच नुकसान भरपाई म्हणुन जिल्हा प्रशासनाने 72 कोटी 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. जवळपास 1 लाख 28 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली असल्याची माहिती आता समोर येत आहे.
47% पैसेवारी जारी
अकोला जिल्ह्यासाठी यंदा अंतिम पैसेवारी 47% जारी केली गेली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनेत फायदा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता महसूलात सूट, सरकारी कर्जाचे पुनर्घटन, विविध शेतीविषयक कर्जाच्या वसुलीला स्थगिती, वीजबिलात साडे 33% सूट मिळणार, विद्यार्थी वर्गाला परीक्षा शुल्कमध्ये सवलत, पंपाची विजजोडणी खंडित केली जाणार नाही यासारख्या अनेक सवलती मिळतील त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 05 January 2022, 12:34 IST