Raigad News : श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सोयाबीन साठी, कांद्यासाठी, टोमॅटो साठी शासनाकडून मदत दिली जाते.त्याप्रमाणे कोकणातल्या शेतकऱ्यांना देखील मदत करणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. कोकणातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत नाही. आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या बागा व फळांची पिके घेऊन कोकणातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो.या शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन विशेष प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोकण किनारपट्टीला वादळाचा फटका बसल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी वादळात टिकतील अशी निवारा केंद्रे शासनाकडून बांधली जाणार आहेत. वादळात विजेचे खांब पडल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. त्यासाठी संपूर्ण कोकणामध्ये अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी लाईन करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. तसेच श्रीवर्धन आणि परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, रेवस- रेड्डी या सागरी महामार्गाला 9 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. धरमतर खाडीवरील पूल व बागमांडले बाणकोट पूल यासाठी शासनाने जवळजवळ 3000 कोटींची तरतूद केलेली असून येत्या पंधरा दिवसात निविदाप्रक्रिया राबविण्यात येईल.
शासनाने महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सूट दिली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणावर सर्वांनी भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. समाजातील सर्व घटकंच्या कल्याणसाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील असून विविध लोकांभिमुख निर्णय घेण्यात येत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
Published on: 04 December 2023, 12:08 IST