१) मराठवाड्यात पावसाचा अंदाज तर मुंबईत उष्णतेची लाट
राज्यात सध्या काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आता हवामान खात्याकडून मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मुंबई आणि बाजूच्या परिसरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याने उत्तर कोकणाच्या एकाकी भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने हे वारे येण्याची शक्यता देखील आहे.
२) सर्वसामान्यांचा लालपरीचा प्रवास महागणार
सर्वसामान्यांचा परवडणारा प्रवास म्हणजे लालपरीचा, पण आता तो महाग होणार आहे. आता राज्यात उन्हाळ्याचा सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या वाढते. याच दरम्यान एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेवाढीचा हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी महामंडळाकडून पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते.
३) ई-केवायसी करा अन्यथा १७ हप्ता मिळणार नाही
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीचे १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. लवकरच १७ वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र १७ वा हप्ता मिळण्यापूर्वी जमिनीची पडताळणी करणं शेतकऱ्यांना आवश्यक आहेत. तसंच अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी देखील केले नाही. यामुळे हे शेतकरी १७ हप्त्यापासून वंचित राहू शकतात. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणं गरजेचं आहे.
४) ज्वारीला हमीभावा पेक्षा कमी दर
शासनाकडून रब्बी हंगामातील हमीभाव ज्वारीची नोंदणी अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात ज्वारीची विक्री करावी लागत आहे. तर यंदा ज्वारीसाठी सरकार कडून ३ हजार १८० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र सध्या बाजारात ज्वारीला २ हजार ते २ हजार ५०० रुपये दरम्यानचा दर मिळत आहे. तर हा दर हमीभावा पेक्षा कमी आहे.
५) वाशी बाजारात आंब्याची आवक वाढली
सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होताना दिसत आहे. नवी मुंबईतीला वाशी बाजार समितीत १ लाखांपेक्षा जास्त आंब्याच्या पेट्याची आवक झाली आहे. यात सर्वात जास्त आंबा कोकणातून दाखल झाला आहे. बाजारात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंबा येत आहे. या आंब्याला सरासरी ६०० ते ७०० रुपये डझनचा दर मिळत आहे.
Published on: 16 April 2024, 12:58 IST