१) कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यासोबत वातावरणात देखील सातत्याने बदल होत आहे. याचदरम्यान राज्यात पु्न्हा दोन दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान ३७ अंशांच्याही पलिकडे पोहोचलं आहे. तर मुंबईसोबत कोकणात तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिली आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी रात्रीच्या वेळी उष्ण वातावरण होण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
२) पाण्यासाठी नागरिकांची वणवण
राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिराव लागत असल्याच चित्र देखील आता काही भागात दिसून येत आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तब्बल १ हजार ८०० हून अधिक गावे आणि ४ हजार पेक्षा जास्त वाड्या वस्त्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. यामुळे येथिल नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
३) लातूर बाजार समितीत माथाडी कामगारांचा बंद
लातूर बाजार समितीतील माथाडी कामगारांनी दरवाढ मिळावी यासाठी बंद पुकारला आहे. यामुळे मागील चार दिवसांपासून बाजार समिती शेतमाल खरेदी विक्री बंद आहे. तसंच दरवाढीच्या होणाऱ्या बैठकीला व्यापारी देखील उपस्थित राहत नसल्याने कामगारांनी शेवटी बंदचा निर्णय घेतला आहे. लातूर बाजारात सोयाबीन, तूर, गहू या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. पण कामगारच नसल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना बाजार सुरु होण्याची वाट पाहावी लागत आहे.
४) सोयाबीनचे दर नरमलेलेच, शेतकरी चिंतेत
राज्यात अद्यापही सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नाही. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. काल मंगळवारी राज्यभरात ३२ हजार २३९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या सोयाबीनला सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला आहे. तर या हंगामात सोयाबीन ५ हजार रुपये क्विंटलचा टप्पा ओलाडेल असा अंदाज होता. पण तस झालं नाही यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता दरामुळे चिंतेत आहेत.
५) तूर ११ हजारांच्या पुढे, शेतकरी समाधानी
राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. बाजारात तुरीला जवळपास ११ हजारांच्या पुढे दर मिळत आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचं दिसून येत आहे. तर काल मंगळवारी राज्यभरात २२ हजार ५७० क्विंटल तुरीची आवक झाली. या तुरीला बाजारात १० हजार ते ११ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येत आहे.
Published on: 17 April 2024, 12:30 IST