देशाची प्रगती शेती व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर असुन शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालास बाजारभाव पाहिजे. कृषी संशोधन महत्वाचे असुन कृषी क्षेत्राच्या प्रगतीची मदार ही कृषीच्या विद्यार्थ्यांवर आहे. कृषीचा विद्यार्थ्यी स्वत: एक विद्यापीठ झाले पाहिजे. कृषी शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली बाब आहे. जीवनात चांगले-वाईट करण्याची ताकद प्रत्येकात असते, आत्मचिंतन केले तर तुम्ही चांगलाच मार्ग निवडाल. संघर्ष व समस्यांशी दोन हात करतांनाच यशाचा मार्ग सापडतो. स्वत:तील आत्मविश्वासच जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा देतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पदमश्री मा. अॅड उज्वलजी निकम यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी महाविद्यालयाच्या वतीने युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्यातील आव्हाने या विषयावर दिनांक 17 नोव्हेबर रोजी आयोजित विद्यार्थ्यी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार श्री. जयप्रकाशजी दगडे, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. अॅड उज्वलजी निकम पुढे म्हणाले की, जीवनात ज्ञानाची भुक पाहिजे. तपश्चर्याने ज्ञान संपादन होते. विद्यार्थ्यांनी बुध्दीचे सामर्थ्य ओळखले पाहिजे. आपल्यात सकारात्मकता असली पाहिजे, नकारात्मकता आपोआप नष्ट होते. आपल्याकडे प्रामाणिकपणा असल्यास गुन्हेगाराच्याही मनात दबदबा निर्माण करू शकतो. भविष्यात विविध क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, परंतु विद्यार्थ्यी दशेतच देशासाठी, समाजासाठी व कुटूंबासाठी काम करण्याची भावना मनात सतत ज्वलंत ठेवा. प्रत्येक क्षणी मन विचारी ठेवा, समस्येत मार्ग सापडतोच. महाविद्यालयातील रॅगींगच्या प्रकारामुळे अनेक ग्रामीण विद्यार्थ्यामध्ये मानसिकरित्या नैराश्य येते, त्यामुळे महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांना एक सुरक्षतेचे वातावरण आपण निर्माण करावे. भारतात सर्व धर्म व जातीचे लोक गुण्यागोविंदात राहतात, त्यामुळेच देशाची प्रगती होत आहे, देश समृध्दीकडे जात आहे. युवकांनी अविवेकी मानसिकता बाळगु नका, असा सल्ला देऊन मा. अॅड उज्वलजी निकम यांनी न्यायालयात गुन्हेगारी दावे लढतांना आलेल्या विविध अनुभव खुमासदार शैलीत कथन केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी महाविद्यालयीन युवकांत समाजभान निर्माण करण्याकरिता विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीचे विचार त्यांच्या पर्यत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगुन मा अॅड. उज्वल निकम यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी म्हणजे सर्वासाठी पर्वणीच ठरली असे मत व्यक्त केले.कार्यक्रमात विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन मा अॅड उज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठातील विविध क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यी रूपेश बोबडे, रंगोली पडघन, प्रतिक्षा पवार, शैलेंद्र कटके, देवयानी शिंदे, मंजुषा कातकडे, शुभम राय आदींची सत्कार मा. अॅड उज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ. मृण्मयी भजक यांनी केले तर आभार डॉ. विलास पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थ्यी तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
Published on: 18 November 2018, 07:04 IST