१.कांदा निर्यातबंदीचा उत्पादकांना आर्थिक फटका
कांदा निर्यातबंदी कायम असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याला चांगला दर मिळत होता. पण पुन्हा निर्यातबंदीचा काळ वाढवल्याने दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल राज्यात १ लाख ६५ हजार ३८७ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. तर या कांद्याला राज्यात सरासरी १० ते ११ रुपये किलोचा दर मिळाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर बाजार समितीत काल कांद्याची १७ हजार ४५७ क्विंटल कांद्याची आवक झाली असून या कांद्याला सरासरी १० रुपये किलोचा दर मिळाला आहे. तर नाशिकमध्ये ६१ हजार ९७० क्विंटल कांद्याची आवक झाली असून या कांद्याला १२ रुपये किलोचा दर मिळाला आहे.
२.बाजार समितीत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर
राज्यात सोयाबीनचे दर अजूनही बाजार समितीत हमीभावाच्या खाली असल्याचं दिसून आलं आहे. काल राज्यात ३७ हजार ८३१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. पण सर्वच बाजार समितीत या सोयाबीनला हमीभावाच्या खाली दर मिळाला आहे. लातूर बाजार समितीत काल १० हजार ४३५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या सोयाबीनला जास्तीत जास्त दर ४ हजार ५१३ रुपयांचा मिळाला आहे. तर सोयाबीनचा केंद्र सरकारने हमीभाव २०२३-२४ साठी ४ हजार ६०० रुपये जाहीर केला आहे.
३.बाजारात हरभऱ्याची आवक मंदावली
रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून हरभरा पिकाकडे पाहिले जाते. मागील वर्ष अलनिनोचं वर्ष असल्याने राज्यात पावसाने कमी हजेरी लावली. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीकडे कल दिला. यामुळे सध्या बाजार समितीत हरभऱ्याची आवक पाहायला मिळत आहे. मात्र दोन दिवसांच्या आवकेनुसार काल राज्यात हरभऱ्याची आवक मंदावली असल्याचं पाहायला मिळालं. काल राज्यात हरभऱ्याची ४६ हजार ७८० क्विंटल आवक झाली आहे. या हरभऱ्याला जास्तीत जास्त दर ६ हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे. केंद्र सरकारने या वर्षी हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ४४० रुपये जाहीर केला आहे.
४.बाजारात गव्हाची आवक मंदावली
मागील दोन दिवसांच्या तुलनेत राज्यातील बाजार समितीत गव्हाची आवक मंदावली असल्याचं चित्र दिसून आलं आहे. तर काल राज्यात २४ हजार ४७० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. तर गव्हाला हमीभावा पेक्षा १०० रुपयांचा दर जास्त मिळत असल्याचं चित्र आहे. तर या वर्षी केंद्र सरकारने गव्हाचा हमीभाव २२७५ रुपये जाहीर केला आहे. तर काल मुंबईत गव्हाला सर्वाधिक दर ४४०० रुपये क्विंटलला मिळाला आहे.
५.राज्यात उन्हाचा पारा वाढला
राज्यात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक भागातील तापमान ३७ अंशापार गेलं आहे. यामुळे नागरिक आता गरमीला सामोरे जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसंच आगामी काळात या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काल सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Published on: 23 March 2024, 02:03 IST