१) मराठवाड्यात पुन्हा अवकाळीचा इशारा
राज्यात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. यामुळे शेतपिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यातच आता पु्न्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच या भागात तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
२) पावसामुळे मराठवाड्यात पिकांचं मोठं नुकसान
राज्यात अवकाळीने हाहाकार माजवला आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. तर आतापर्यंत मराठवाड्यात ९ हजार हेक्टरपेक्षा जास्तीच्या क्षेत्राचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या प्रचारात आणि कामात व्यस्त असल्यामुळे पंचनामे होण्याची कोणतीही आशा दिसून येत नाही.
३) विदर्भात अवकाळी पावसाचा धूमाकूळ सुरूच
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांचा घरावरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
४) अवकाळीचा जोर किती दिवस राहणार?
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच अवकाळीमुळे शेतपिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या भागात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान हा अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यावर हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
५) मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाने घेतली पवारांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक येथील सभेत गोंधळ घालणारा तरुण किरण सानप याने शरद पवारांची भेट घेतली आहे. नाशिकच्या एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये शरद पवार मुक्कामी आहेत. हॉटेलमध्ये जाऊन किरण सानपने शरद पवारांची भेट घेतली आहे. या तरुणाने नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील मोदींच्या सभेत कांद्यावर बोला म्हणून घोषणाबाजी केली होती.
Published on: 17 May 2024, 01:56 IST