१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावातील शेतीत रमल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या शेतात हळद काढणी केली आहे. तसंच ट्रॅक्टर देखील त्यांनी चालवला असून संपूर्ण शेताला फेरफटका मारला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे मुख्यमंत्री शिंदे यात्रेनिमित्त आले असून ते काही वेळ आपल्या शेतात रमल्याचं पाहायला मिळालं आहे. शिंदेंच्या शेतात सध्या औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा , सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.
२) जलयुक्त शिवार अभियानच्या कामांला गती द्या, देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला आदेश
‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवून कामांना गती द्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील ऑनलाईन प्रणाली द्वारे उपस्थित होते.
३) राज्यात पुन्हा हुडहुडी वाढली; कोकणात अवकाळीचा इशारा
उत्तर भारतातील थंड वाऱ्याचा राज्यातील वातावरणावर परिणाम दिसून आला आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला असून थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात देखील सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. तसंच राज्याच्या बहुतांश भागातील तापमानात घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशांवर असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आलेत. जर कोकणात अवकाळीने हजेरी लावली तर आंबा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
४) कांद्याचे दर घसरले, उत्पादक शेतकरी नाराज
नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत येताना दिसत आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे दर आता निम्म्यानेच कमी झालेत. सध्या कांद्याला सरासरी १ हजार ३०० रुपयांचा दर मिळतोय. तर जानेवारीच्या सुरुवातीला हाच दर ३ हजार ५०० रुपयांच्या जवळ होता. तोच दर आता जानेवारीच्या शेवटी १३०० रुपयांवर आला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने केलेल्या निर्यातबंदीमुळे क्विंटलमागे दोन हजार रुपयांपर्यंत घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागला आहे.
५) पपईला ५ किलोचा दर द्या; शेतकऱ्यांचा निर्धार
जळगावमध्ये पपई दराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. जो पर्यंत पपईची जागेवर खरेदी ५ रुपये किलो दराने होत नाही, तोवर पपई काढणी बंद करण्याचा निर्धार पपई उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. या भागात सध्या पपईची खरेदी तीन ते साडेतीन रुपये किलो दराने केली जात आहे. यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच जागेवर पपईला ५ किलोचा दर मिळावा असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
Published on: 25 January 2024, 05:21 IST