१) राज्यात गारठा वाढला; अवकाळीचीही शक्यता
राज्यातील हवामानात बदल झाल्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलेत. तर दुसरीकडे नाशिकमधील काही भागात तापमान १० अंशांच्या खाली पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात हवामान खात्याने थंडीचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. यामुळे नागरिकांना अजूनही शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंशांदरम्यान आहे.
२) राज्यात शेततळ्याचे ४१ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान वाटप
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली आहे. त्यामुळे ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना अडचणींतून बाहेर काढण्यासाठी राबवली जात आहे.
३) वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा; मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश
एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आल्या आहेत. वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण होण्यासाठी शेतकरी, वस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मितीवर अधिक भर देऊन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात. मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, शेतीशी निगडित असलेल्या तुती लागवड उद्योगातून शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तुती ते रेशीम ही साखळी अधिक सोपी करून ती विकसित करावी. तसंच राज्यात रेशीम उद्योगाला अधिक चालना द्यावी, असंही पाटील म्हणाले.
४) कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका
कांदा निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात चांगलाच बसला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला कांद्याचे दर ३ हजार ५०० रुपयांच्या पुढे होते ते तर आता निम्म्यानेच कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. आता कांद्याला सरासरी दर १२०० ते १३०० रुपये मिळताना दिसत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
५) बाजारात तुरीला ९ ते १० हजार रुपयांचा दर
सध्या बाजार समितीत तुरीची आवक अल्प प्रमाणात सुरु झाली आहे. यामुळे सध्या तुरीला दर मिळताना दिसतोय. पण पुढील आठवड्यात बाजार तुरीची आवक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण याचा दरावर परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. तसंच तूर डाळीचे वाढलेले दर देखील तुरीची आवक बाजारात झाल्यानंतर कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या तुरीला काही बाजार समितीत ९ हजार ते १० हजार रुपयांचा दर मिळतोय. तर तुरीचा हमीभाव सरकारने यंदा ७ हजार रुपये जाहीर केला आहे.
Published on: 24 January 2024, 05:27 IST