राज्यातील कृषी विभागात गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सध्या वसंत मुंडे यांच्या आरोपामुळे शेतकऱ्याच्या बांधापासून ते शासन दरबारी सर्वीकडे एकच चर्चा रंगली आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वसंत मुंडे यांनी मध्यंतरी जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार उघडकीस आणून दिला होता. यामुळे आता याच वसंत मुंडे यांनी कृषी विभागातील एका अधिकाऱ्यावर गंभीर आरोप लावल्याने सर्वांचे लक्ष आता याकडे लागले आहे. वसंत मुंडे यांनी, शेतकऱ्यांचे उत्पादन कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी कृषी विभागातीलच अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे.
खत, बियाणे आणि औषध खरेदी मध्ये सुरु असलेल्या गैरव्यवहारात कृषी विभागात कृषी संचालक या पदावर कार्य करीत असलेले दिलीप झेंडे यांचा समावेश असल्याचा वसंत मुंडे यांनी आरोप केला असून यासंदर्भात इडीकडे चौकशी करण्याची मागणीदेखील केली आहे. वसंत मुंडे यांच्या मते गेल्या तीन वर्षापासून खत बियाणे आणि औषध विक्रीत गैरव्यवहार सुरू आहे. वसंत मुंडे यांनी दिलीप झेंडे यांच्याविरोधात राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे देखील तक्रार नोंदवली आहे.
याशिवाय मुंडे यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केल्याचे निष्पन्न झाले आहे. वसंत मुंडे यांच्या आरोपावरून शेती साठी काम करणाऱ्या विभागातूनच शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर शेतीला अच्छे दिन केव्हा येतील हा मोठा प्रश्नचिन्ह उभा झाला आहे. असे असले तरी, याबाबत अजून कुठलीही चौकशी झालेली नाही त्यामुळे चौकशीत नेमके काय गुपित समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृषी विभागाचे कार्य शेतकऱ्यांचे हित जोपासणे हेच आहे मात्र याच विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप होत असेल तर आपला कृषिप्रधान देश नेमक्या कोणत्या वळणावर जाईल? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात बोगस बियाणे खत आणि औषध खरेदी मध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचे सांगितले जातं आहे. हा सर्व गैरव्यवहार दीलीप झेंडे यांच्या भावाच्या देखरेखेखाली होत असल्याचा व याच्या साठी दिलीप झेंडे यांच्याकडे एक संपूर्ण टीम असल्याचा खळबळजनक आरोप वसंत मुंडे यांनी यावेळी केला.
याविरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत मात्र त्या कागदावरच खोडल्या जातात असे भासत आहे. या प्रकरणात जागल काम करनाराच चोरी करतोय का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कोकण विभागात देखील झेंडे यांच्या सहकार्यातून युरियाचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला गेला आहे.
वसंत मुंडे यांनी सांगितले की, प्रशासनात काम करणारे अधिकारी यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सरकारच्या मंत्र्यांचा पाठिंबा असतो. यामुळे राज्य सरकारकडे या प्रकरणात तक्रार करून काहीच निष्पन्न झाले नसते म्हणून इडीकडे तक्रार करण्यात आली आहे.
याबाबतीत मुख्यमंत्री महोदयांच्या कडे देखील तक्रार दाखल झाल्याचे समजत आहे. वसंत मुंडे यांनी झेंडे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी केली. वसंत मुंडे यांच्या आरोपावरून कृषी विभागापासून ते मंत्रिमंडळात एकच खळबळ बघायला मिळत आहे. यामुळे कोणाच्या बुडाखाली अंधार लपलंय हे लवकरच जनतेच्या पुढे येणार आहे.
राज्यभर बोगस बियाणे विरुद्ध शेतकऱ्यांच्या लाखो तक्रारी दाखल झाल्या आहेत मात्र कृषी सहसंचालक यांचा थेट यात समावेश असल्याने या तक्रारी निकाली काढल्या जाऊ शकले नाहीयेत. या प्रकरणात दिलीप यांचा समावेश आहे आणि त्याबाबत आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा वसंत मुंडे यांनी यावेळी केला.
Published on: 25 March 2022, 04:37 IST