मुंबई: शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत यासाठी राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य शासन, विविध कॉर्पोरेट कंपन्या, शेतकरी कंपन्या यांच्यामध्ये 46 सामंजस्य करार करण्यात आले. रिलायन्स रिटेल, ॲमेझॉन, वॉलमार्ट, महिंद्रा ॲग्रो, पेप्सिको, टाटा रॅलीज, बिग बास्केट, पतंजली यांसारख्या नामवंत कंपन्यांबरोबर हे करार करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात राज्यातील 10 हजार गावांमध्ये स्मार्ट प्रकल्प राबविला जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देणे आणि या माध्यमातून कृषी तसेच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पदुममंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश ऐयर आदी उपस्थित होते.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री (सीआयआय) हे या प्रकल्पाचे उद्योजकीय भागीदार आहेत. स्मार्ट प्रकल्पात सुमारे 2 हजार 118 कोटी रुपये इतका निधी गुंतविण्यात येणार असून त्यापैकी 1 हजार 483 कोटी रुपये इतक्या निधीचा वाटा जागतिक बँक उचलणार आहे. राज्य सरकारतर्फे 565 कोटी रुपये तर व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशनमार्फत 71 कोटी रुपये इतका निधी पुरविण्यात येईल. व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशनचा निधी हा सीएसआरच्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात विकेंद्रित जलसाठे तयार झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण आता या उत्पादनाला चांगला भाव मिळवून देणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे. यासाठीच राज्य शासनाने ‘स्मार्ट’ प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन येईल. या प्रकल्पामुळे शेतकरी आणि बाजारपेठ तसेच शेतकरी आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यामध्ये थेट लिंकेज तयार होणार आहे. त्यामुळे मध्यस्थांना आळा बसून शेतकऱ्यांच्या कृषीमालास चांगला भाव मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद म्हणाले, भारतातील शेतकऱ्यांबरोबर काम करण्यासाठी वर्ल्ड बँक उत्सुक आहे. इथली शेती ही उत्पादन आधारितपेक्षा बाजारपेठ आधारित होणे गरजेचे आहे. यासाठी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्ल्ड बँक सर्वतोपरी सहकार्य करेल, असे ते म्हणाले.
वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश ऐयर यावेळी म्हणाले, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये वॉलमार्ट आपले स्टोअर सुरु करत आहे. एका स्टोअरमधून साधारण 2 हजार इतक्या रोजगाराची निर्मिती होते. आम्ही पुढील काही दिवसात महाराष्ट्रात 30 हजार रोजगार देऊ. ग्राहकांना किफायतशीर दरात उत्पादने विकण्याबरोबरच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यावर आमचा भर असेल, असे ते म्हणाले.
यावेळी राज्य शासनाच्या व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशन आणि रिलायन्स रिटेल, ॲमेझॉन, वॉलमार्ट, महिंद्रा ॲग्रो, आयटीसी, पेप्सिको, टाटा रॅलीज, बिग बास्केट, टाटा केमिकल्स, एचयूएल, वरुण ॲग्रो, पतंजली, स्टार क्विक, एएए कमानी, आयडीएच सस्टेनेबल ट्रेड, मेरा किसान, लिन ॲग्री, वे कूल, मार्केट यार्ड, हॅप्पी रुट्स, ऑरगा सत्व, फार्मलिंक ॲग्री डिस्ट्रिब्युशन, प्युअरगॅनिक या कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत सामंजस्य करार केले.
याशिवाय यावेळी विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि शेतकरी कंपन्या यांच्यामध्येही कृषीमाल देवाण-घेवाणीबाबत सामंजस्य करार करण्यात आले. यात प्रामुख्याने एडीएम ॲग्रो इंडस्ट्रिज, आयएनआय फार्मस, वरुण ॲग्रो सीपीएफ इंडिया, ग्रोटर ऑरगॅनिक फुड्स, ॲग्रीटा सोल्युशन्स, गो फॉर फ्रेश, एस फॉर एस टेक्नॉलॉजी आदींबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी स्मार्ट प्रकल्पाच्या लोगोचे तसेच संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
Published on: 06 December 2018, 08:17 IST