News

मुंबई: गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करणे यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन (व्हिएसटीएफ) संस्थेची स्थापना केली आहे. त्यामध्ये आता सहकार व पणन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या 5,000 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम जोडण्यात आल्यामुळे, या दोन्ही उपक्रमातून गावा-गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय निर्मितीचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

Updated on 27 February, 2019 8:16 AM IST


मुंबई:
गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करणे यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन (व्हिएसटीएफ) संस्थेची स्थापना केली आहे. त्यामध्ये आता सहकार व पणन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या 5,000 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम जोडण्यात आल्यामुळे, या दोन्ही उपक्रमातून गावा-गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय निर्मितीचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक हजार गावे मॉडेल व्हिलेज म्हणून तयार व्हावी, यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन संस्थेची स्थापना केली. यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचाही सहभाग घेण्यात आला. सदर निवड गावांमध्ये लोकसहभागातून गट शेती, शिक्षण, ग्राम विद्युतीकरण, कौशल्य विकास, वृक्ष लागवड, संगणकीय साक्षरता, पक्की घरे, बालमृत्यू थांबविणे, स्वच्छता,जलसंधारण इत्यादी विषयांवर कामे सुरू झाली आहेत. त्यासाठी गावांगावांमध्ये विविध विषयात पारंगत ग्राम परिवर्तक नेमले आहेत. राज्यातील 11 जिल्ह‌्यात 280 गावांच्या विकासापासून सुरू झालेल्या कार्यक्रमात टप्प्याटप्प्याने आता, 25 जिल्हे आणि एक हजार गावांचा समावेश झाला आहे. सहकार व पणन विभागाच्या अटल महापणन विकास अभियानांतर्गत पाच हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम जोडण्यात आला आहे, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

या दोन्ही कार्यक्रमांची योग्यरित्या सांगड घालून व्हिएसटीएफच्या गाव विकास आराखड्यात सहकारी संस्थेच्या बळकटीकरणासाठी शेतीपूरक व्यवसायांची निर्मिती करण्यात येत आहे. सद्यस्थितीत, राज्यात 2 हजार 234 व्यवसाय सुरू झाले असून, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी सुविधा केंद्र, महा ई सेवा, शेतीमाल स्पायरल सेपरेटर, गृहनिर्माण सोसायट‌्यांमध्ये कॉप शॉप्स, धान्य खरेदी केंद्र, आर.ओ. वॉटर एटीएम प्लांट, बि-बियाणे व खते विक्री, शेतमाल वाहतुकीसाठी ट्रॅक्टर भाड्याने देणे असे व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांना कंपन्यांसोबत लिंकेज करण्यात येत आहेत.

रायगड जिल्ह्यातील नादसूर या व्हिएसटीएफ गावातील महिला बचत गटांनी टेराकोटा डिझायनर ज्वेलरी विकसीत करण्याचे काम सुरू केले असून पुणे येथील बाजारपेठेत त्याची खूप मागणी आहे. अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासी गावांमध्ये सुद्धा बचत गटांमार्फत आर्टिफिशीयल ज्वेलरी निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. अटल महापणन विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र सहकार व विकास महामंडळाने स्वत:चा महा फार्म असा ब्रँड विकसीत केला आहे. व्हिएसटीएफच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा म्हणून, सहकारी संस्थेचे, बचत गटांचे उत्पादने महा फार्म खाली आणून त्याची मार्केटींग करण्यावर भर देण्यात आला आहे. यासंदर्भात पंजाब सरकारसोबत करार झाला असून त्याअंतर्गत 8 उत्पादनांची सुरूवात झाली असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

व्हिएसटीएफच्या कामांना गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी सहकार विभागाच्या मदतीने दिनांक 19 ते 28 फेब्रुवारी, 2019 दरम्यान राज्यात लोकसहभागातून गावा-गावात जनजागृती आणि शेतीपूरक व्यवसाय निर्मितीची मोहीम सुरू झाली आहे. त्यांतर्गत शेतकऱ्यांना सहकारी संस्थेसोबत जोडण्याचे काम सुरू आहे. सदर मोहिमेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

English Summary: Agriculture allied business generation through Maharashtra Village Social Transformation Foundation
Published on: 27 February 2019, 08:11 IST