मागील वर्षी निर्माण झालेला कापसावरील शेंदरी बोंडअळीचा धोका यावर्षी उदभवु नये, या हेतुने महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीने विविध विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना कापसावरील शेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापनाकरीता मार्गदर्शन करण्यात येत आहे. या विस्तार कार्यक्रमात मराठवाडा विभागातील विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्यीही सरसावले आहेत.
कृषि पदवीच्या संपुर्ण सातवे सत्र हे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) म्हणुन राबविण्यात येतो, या कार्यक्रमात कृषीचे विद्यार्थ्यी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी तंत्रज्ञानाचे धडे घेतात. यावर्षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्या संकल्पनेतुन व शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावे अंतर्गत कापसावरील शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन विशेष मोहिम राबविण्यात येत असुन या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहचविण्याचा विद्यापीठाचा उद्देश आहे. मराठवाडयात एकुण 27 घटक व संलग्न कृषि महाविद्यालय असुन 2280 विद्यार्थ्यी यावर्षी या सत्रात असुन ते मराठवाडयातील 198 गावांमध्ये कार्यरत आहेत.
आजपर्यंत सदरिल 198 गावात हे कृषिदुत व कृषिकन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले असुन पुढील काही दिवसांत पाचशे पेक्षा जास्त गावात ही मोहिम राबविण्याचे लक्ष आहे. शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ञ तसेच संबंधित कृषि महाविद्यालयातील किटकशास्त्राचे प्राध्यापक वेळोवेळी मार्गदर्शन करित आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतावर किडींची नुकसानीची आर्थिक पातळी तपासण्यासाठी कामगंध सापळेही विद्यार्थ्यांनी लावले असुन कामगंध सापळे, मित्रकिडींचे महत्वही शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. तसेच किडकनाशक फवारणीचे वेळापत्रक यांचे ही वाटप शेतकऱ्यांना करण्यात येत असुन प्रात्यक्षिकाव्दारे किडकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयीही मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा संपुर्ण उपक्रम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व संबंधीत गावांतील कृषी सहाय्यक यांच्या सहकार्याने राबविण्यात येते आहे. उपक्रमासाठी विद्यापीठ रावे समन्वयक डॉ. राकेश आहिरे, किटकशास्त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर आदीसह संबंधित कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यापीठ शास्त्रज्ञ परिश्रम घेत आहेत.
आजपर्यंत मराठवाडयातील 198 गावात शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन, पुढील काही दिवसात एकुण पाचशेपेक्षा जास्त गावात पोहचण्याचा कृषीदुतांचा निर्धार..
Published on: 09 August 2018, 03:11 IST