आज जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार होते. पण मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकाऱ्यांना येण्यास उशीर झाल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली.
दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाला ST संवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते.या वेळी शासनाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन ५० दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली तरी सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधूण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने आज जालन्यात मोर्चा काढण्यात आला.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जालना जिल्ह्यात तीव्र वळण मिळाले. या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकाऱ्यांना येण्यास उशीर झाल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील काचा, कुंड्यांची आणि वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Published on: 21 November 2023, 06:25 IST