News

आपत्ती काळात कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत काम करणाऱ्या यंत्रणांनी घ्यावी. यासाठी अपूर्ण कामे, रिटेनिंग वॉल्स, नाल्यांचे काठ आणि इतर धोका दायक ठिकाणांची नियमित तपासणी व पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी सावधानतेची चिन्हे लावावीत आणि नागरिकांना त्याबाबत माहिती द्यावी.

Updated on 29 May, 2025 2:35 PM IST

मुंबई : आपत्ती काळात राज्य शासनामार्फत मदत बचाव कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येते. आपत्तीमध्ये शासन प्रशासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या यंत्रणांनी या काळात सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टी, आपत्ती व्यवस्थापन संदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मदत, पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके आदी उपस्थित होते.

आवश्यक ठिकाणी सावधानतेची चिन्हे लावावीत

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, आपत्ती काळात कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत काम करणाऱ्या यंत्रणांनी घ्यावी. यासाठी अपूर्ण कामे, रिटेनिंग वॉल्स, नाल्यांचे काठ आणि इतर धोका दायक ठिकाणांची नियमित तपासणी पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी सावधानतेची चिन्हे लावावीत आणि नागरिकांना त्याबाबत माहिती द्यावी. आपत्ती काळात रेल्वे स्थानक, वाहतूक व्यवस्था, जलपुरवठा केंद्रे यासारख्या ठिकाणी धोकादायक स्थिती जाणवल्यास या सेवा तात्पुरत्या थांबविण्यात याव्यात.

यंत्रणांनी वस्तुनिष्ठ माहिती द्यावी

आपत्तीत काम करणाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री दिली जावी. आपत्ती काळात घ्यावयाची दक्षता याबाबत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सूचना एकाच ठिकाणाहून दिल्या जाव्यात. आपत्तीमध्ये दिल्या जात असलेल्या मदतीची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्रे अन्य माध्यमातून नागरिकांना दिली जावी. याबरोबरच आपत्तीमधील घटनांची वस्तुनिष्ठ माहिती देण्यात यावी. पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करावी. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सजगता दाखवावी, असे निर्देशही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी दिले.

English Summary: Agencies should remain alert during disasters Chief Secretary Sujata Saunik instructions
Published on: 29 May 2025, 02:35 IST