सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी, बुलडाणा जिल्ह्यात दि. 20 रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा पार पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर आज बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांना अटक केली आहे. तुपकर यांना अटक झाल्याने कार्यकर्ते आक्रमक होत निषेध व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुलडाणा पोलीसांनी रविकांत तुपकर यांना कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. यावर प्रतिक्रिया देताना, अशा नोटीसांना मी भीक घालत नाही, शेतकऱ्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा होत असेल तर तो आम्ही कायम करणार.पोलीसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये,आंदोलनात आम्ही शहिद होण्याची तयारी आहे. मंत्रालय कोणाची प्रोपर्टी नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर 29 नोव्हेंबरला आम्ही मंत्रालयाचा ताबा घेणार म्हणजे घेणारच असा इशारा तुपकर यांनी दिला होता. त्यामुळे रविकांत तुपकर यांना पोलीसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. तुपकर यांच्या अटकेने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान,बुलढाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर यांच्या अटकेचे पडसाद तीव्र उमट आहेत.रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. पोलीस स्टेशन समोर एका कार्यकर्ताने आत्महत्येचा प्रयत्न केला. तर रविकांत तुपकर यांच्या पत्नी देखील पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन करीत आहेत. जामखेड येथे टायर जाळून कार्यकर्ते रस्त्यावर आले आहे. तर काही ठिकाणी रास्तारोको करण्यात येत आहे.
Published on: 25 November 2023, 06:49 IST