News

“मुलांच्या शिक्षणासाठी ऊसतोडायला कारखान्याला जायचे नाही असं ठरवलं होतं, पण काही केल्या यंदा जावं तर लागणार असं दिसतंय, ऊस तोडायचा नाही, असं म्हणत होतो, पण नशिबानं माझ्या हातून ऊस तोडून घ्यायचा ठरवलं हाय.”. हे ऐकल्यावर मला काय बोलावं हे समजत नव्हतं.

Updated on 14 September, 2023 6:45 PM IST

सोमिनाथ घोळवे

टपरीवर चहा घेत समोरच्या व्यक्तीला नाव किंवा गाव न विचारता, त्यांना म्हणालो “कसे आहात?”. “यंदा कसं आहे पीक-पाणी?”. ओळख असल्यागत बोललो. त्या व्यक्तीच्या अंगावरील पेहराव शेतकऱ्याचा होता, म्हणूनच मी विचारले होते. त्या व्यक्तीचा चेहरा हळूच स्मित हस्य झाला आणि म्हणाले, “यंदा काही घरी राहता येणार नाही. पहिली उचल घेऊन कारखान्याचा रस्ता पकडावा लागतोय. काय सांगावा?, सहा वर्षानंतर पुन्हा ऊस तोडायला जावा लागतंय.”.

मी म्हणलो, का? काय झालं? त्यावर समोरची व्यक्ती, म्हणाले “ गेल्या २७ दिवसांपासून पाऊस नाही. पिके करपली, रान वाळली, जमिनीला भेगा पडल्या, जनावरांच्या चारा प्रश्न आहेच. विहिरी आठल्या, बोअरवेल हळूहळू कोरड्या पडू लागल्या, त्यामुळं पाणी मिळेल की नाही सांगता येत नाही, कारखान्याला जाऊन चार-पाच महिने जनावरे तरी जागवता येतील......” थोड शांत होऊन, गंभीर होऊन ती व्यक्ती पुढे बोलू लागली...

“मुलांच्या शिक्षणासाठी ऊसतोडायला कारखान्याला जायचे नाही असं ठरवलं होतं, पण काही केल्या यंदा जावं तर लागणार असं दिसतंय, ऊस तोडायचा नाही, असं म्हणत होतो, पण नशिबानं माझ्या हातून ऊस तोडून घ्यायचा ठरवलं हाय.”. हे ऐकल्यावर मला काय बोलावं हे समजत नव्हतं. मी काहीवेळ शांत झालो. त्यावर समोरची व्यक्ती स्वत:हून मला म्हणाली, “काय झालं?. मी म्हणालो, “काही नाही.” कारण मला माझ्या ऊस तोडणीचे दिवस आठवले. मी शांत झालो असल्याने आणि काहीच बोललो नाही. मात्र समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून, त्यांनी मला ओळखले असल्याचं समजत होतं.

त्यावर ते (शेतकरी) पुन्हा मला म्हणाले ; “मी तुम्हाला ओळखतो. तम्ही प्रभूचं (प्रभाकर मुंडे) भाचा आहात ना? लहानपणापासून मी तुम्हाला पहात आलो आहे. तुम्ही कसं शिकलात हे माहित हाय. तुमच्याकडे पाहूनच मुलांना शिक्षण देईचा विचार करून ऊस तोडायचा सोडला. पण आता काय खरं नाही. मुलांना शिक्षण देईल असे वाटत नाही. मुलांच्या शिक्षणांच मातरं होईला करतंय. यंदा पाऊसानं खूपच अवगड करून टाकलं हाय, काय सांगावं".

पुन्हा मी शांत झालो होतो. त्यांच्या बोलण्यानं मी आत्मचिंतन करायला लागलो होतो. मला पुन्हा मी उसतोडणी करत असताना, शाळेत कसा जात होतो, शाळा शिकण्यासाठी काय-काय करावं लागलं होतं ते दिवस आठवलं. चहाचा कप तोंडाला लावून फुरका मारला. पण आमचा संवाद चालू असल्याने कपातील चहा गार झाला होता. त्या गार चहाची चव जिभेला गोड लागली होती. पण समोरच्या व्यक्तीचे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत बोललेले शब्द कडू लिंबाच्या काडा दिल्यासारखे मनाला कडवट वाटले. तसेच ते शब्द वास्तव होते. कारण माझ्या डोळ्यासमोर चटकन राजकीय नेतृत्व, मुकादामांच्या संघटना, कारखानदार, प्रशासकीय अधिकारी आणि शासकीय धोरणांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या भविष्य अंधारमय कसे करून ठेवल्याचे वास्तव डोळ्यासमोर आले.

ऊसतोड मजुरांना शिक्षण मिळू न देणे किंवा गावी जलसंधारणाची कामे न होऊ देणे यात वरील घटकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे तितकेच खरे आहे. राजकीय नेतृत्वाने दुष्काळमुक्तीचे राजकारण करण्याऐवजी ऊसतोड मजुरांच्या भावनेचे राजकारण केले. यामुळं ऊसतोड मुक्तीऐवजी ऊसतोड मजुरांच्या पिढ्या तयार झाल्या आहेत.

चालू खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पाऊस कमी झाल्याने काढून घेतला होता, दुसरीकडे घरदार सोडून मुलांच्या शिक्षणावर पाणी टाकून ऊसतोडणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ लागल्याचे दिसून येत होते. हे वास्तव स्वीकारले तरीही मला ऊसतोड मुलांच्या शिक्षणाचा विषय फारच गंभीर वाटला. कारण गेली तीस ते चाळीस वर्ष उसतोडणी कामगारांच्या मुलांचा प्रश्न सोडवा अशी मागणी आहे. पण ती सोडवली जात नाही.

अनेकदा उसतोडणी मजुरांच्या वतीने संप होतात. पण शिक्षणाची समस्या सोडवण्यासाठी कोणीही तयार होत नाही. एकंदर व्यवस्थेने आणि नेतृत्वाने ऊसतोड मजुरांच्या मुलांचे हवे असलेल्या शिक्षणाची संधी हिरावून घेतली गेली आहे. आमची चर्चा पुढे जवळजवळ २० मिनिटे चालूच राहिली. बरेच बोलून झाले होते. त्यांची माझ्याशी बोलताना व्यक्तीमध्ये चिंता- काळजी, तळमळ दिसून येत होती. मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह किंवा आश्रम शाळेचा पर्याय सुचवावा असे मला वाटत होते. पण वेळ निघून गेल्याने काही करता येत नव्हते.

राहून-राहून माझ्या मनात येत होते की, व्यक्तीने नेमका काय गुन्हा केला असेल? 6 एकर जमीन आहे, घरी बैल आहेत, दुभत्या दोन गाई घरी आहेत, २० लिटर दुध उत्पादन केले जाते, दुधाच्या पैशांवर बाजारहाट भागत होता. कोणतेही व्यसन नाही. त्यामुळे कुटुंबाचा फारसा खर्च देखील नाही. संसार आनंदी होता. पण पाऊस नसल्याने आनंदी संसारावर कुऱ्हाड ढासळणार हे मात्र निश्चित दिसून येत होते. सर्व असतानाही त्या व्यक्तीला कारखान्याचा-उसतोडणीचा रस्ता धरावा लागत आहे. असे का? तर गेल्या ७६ वर्ष स्वातंत्र्य मिळूनही परावलंबी जीवनपद्धती का? दुष्काळाचा फेरा आला की आनंदी संसार उद्ध्वस्त होतात. असे का? जगण्याची शाश्वती का नाही?. असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

आशाच काहण्या आहेत इतरही काही कुटुंबाच्या सापडतात. चालू वर्षात पावसाच्या झालेल्या विलंबामुळे शेतकरी-शेतमजुरांचे नियमित जीवन विस्कळीत झाले आहेच. पण संदर्भातील प्रश्न मार्गी लागत नाहीत की पुढे येत नाहीत. ऑगस्ट महिनाभर पाऊस झाला नाही. काही परिसरात अद्यापहि पाऊस नाही. पिके ७० ते ८० टक्के करपली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी स्त्रोत होते, अशा शेतकऱ्यांना ४० ते ५० टक्के पिके जागवता आली आहेत. तरीही केंद्र किंवा राज्य शासनाने काय दखल घेतली नाही. राज्य शासनाच्या मंत्र्यांनी सोडा. पण जिल्हा स्तरावरील अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिके किती आणि कशी करपली आहेत, याचा आढावा घ्यावा असा वाटला नाही की महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करावेत असे वाटले नाही. अर्थात करपलेल्या पिकांची नोंद (रेकॉर्ड) तयार करायला शासन तयार नाही. ही अनास्था का दाखवली जात आहे.

(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
ई-मेल - sominath.gholwe@gmail.com

English Summary: After six years of 'that' sugarcane laborer it was time to cut sugarcane again indian agriculture update sugarcane
Published on: 14 September 2023, 06:43 IST