नमस्कार, मी आपला शुभचिंतक, नितीन पिसाळ…
स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आज देश तिरंगा फडकवत आनंद साजरा करतोय. पण माझ्या मनात एक प्रश्न वीजेसारखा घुमतो - आपण खरोखर स्वतंत्र आहोत का?
शेतकरी राजा आणि त्याची प्रजा-
शेतकरी राजा…ज्याच्या घामातून अन्नाचा प्रत्येक दाणा जन्म घेतो.
ज्याच्या पायाखाली मातीतून जीवन उगवतं,
आणि ज्याच्या पोटावर पाय देऊन आपण सुखात जगतो!
पण हा राजा आजही गुलाम आहे -
कर्जाचा, बाजारभावाचा, हवामानाच्या अन्यायाचा.
प्रजा सुखी आहे, पण राजा अजूनही जखमी आहे…
कधी शिकणारा… आज शिकवणारा...असा माझा मागील 14 वर्षांचा प्रवास (2011-2025)
२०११ मध्ये पशुपालन आणि दुग्धव्यवसायाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकलं.
तेव्हा मी विद्यार्थी होतो- शिकण्याची भूक होती, पैशापेक्षा जास्त स्वप्नं होती.
या १४ वर्षांत तंत्रज्ञान, बाजारपेठ, रोगसंसर्ग सगळं बदललं… पण संघर्ष तसाच राहिला.
आज मी लेखक, अभ्यासक आणि प्रशिक्षक म्हणून पशुपालकांना पोषणशास्त्र, आरोग्य व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या आधुनिक पद्धतींचं मार्गदर्शन करतो.
माझ्यासाठी पशुपालन हा फक्त व्यवसाय नाही, तो विज्ञान, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीचं साधन आहे.
तंत्रज्ञान, वाचन, जुगाड आणि शोध-
मी शंभरपेक्षा जास्त पुस्तके वाचली,
शेकडो लेखांचा अभ्यास केला,
रिसर्च पेपर्स पलटले,
आणि गावातील शेतकऱ्यांच्या 'जुगाड' कल्पनांना वैज्ञानिक आधार दिला.
माझा विश्वास आहे- "बदल घडवायचा असेल तर तंत्रज्ञान आणि परंपरेचा हात घट्ट धरावा लागतो!"
स्वास्थ्य- जैविक ते केमिकल, केमिकल ते कॅन्सर, आणि मग… मृत्यू!
ही माझ्या प्रवासातील सर्वात जखमी करणारी गोष्ट आहे.
आपण जैविक शेती सोडून रसायनांकडे धावलो,
उत्पादन वाढलं, पण विष आपल्या अन्नात आणि रक्तात शिरलं.
आज गावोगावी कॅन्सरसारखे रोग घरं उद्ध्वस्त करतायत…
ही लढाई फक्त जमिनीची नाही,
ती आपल्या शरीराची, आरोग्याची आणि आत्म्याची आहे!
शेतकऱ्याचं आरोग्य म्हणजे देशाचं आरोग्य.
जनावरं आणि माती बरी राहिली, तरच आपण बरे राहू."
माझी एकच विनंती तंत्रज्ञान वापरा, पण माती, पाणी आणि आपल्या शरीराचं नातं विसरू नका.
शेतकरी राजा फक्त पोट भरत नाही, तो राष्ट्राचा कणा आहे.
त्या कण्याला मोडू देऊ नका.*
आजच्या अंकात एवढंच… पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, एका नव्या लढाईसह…
जय जवान, जय किसान, जय विज्ञान!
लेखक-
नितीन रा. पिसाळ
पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
Published on: 14 August 2025, 10:35 IST