आसाममध्ये गेल्या काही महिन्यांत आफ्रिकन स्वाईन फिवरमुळे हजारो डुकरांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देश अद्याप कोरोनाशी सामोरे जात असताना आसाममधील आफ्रिकन स्वाइन फिव्हरने आतापर्यंत १८ हजार डुकरांचा बळी घेतला आहे. या फिवरचे संक्रमण रोखण्यासाठी जवळ- जवळ १२ हजारहून अधिक डुकरांना ठार मारण्यात येणार आहे. याविषयीची वृत्त गाँव कनेक्शन या वृत्तसंस्थेने दिले आहे.
दरम्यान भारतातील ईशान्य राज्यांतील हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह हे वराह पालनावर अवंलबून असते. परंतु आसाममध्ये आलेल्या आफ्रिकन फिवरमुळे या कुटुंबांसमोर रोजगाराचे संकट उभे राहिले आहे. आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील घागोरा बस्ती येथे पोथर अॅग्रोव्ह्ट नावाचे शेत चालवणारे राजीब बोरा यांनी गाँव कनेक्शनला दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकेच्या स्वाइन फिवर प्रसार होण्यापूर्वी जवळ-जवळ ३०० डुक्कर होते, परंतु आता फक्त पाचच डुक्कर त्यांच्याकडे शिल्लक आहेत.
सरकार संसर्ग झालेल्या डुकरांना मारेल,असे अनेक दिवसांपासून आसाम सरकारकडून सांगण्यात येत होते. पण अजूनही संसर्ग झालेल्या डुकरांना मारले गेले नाही. यामुळे संसर्ग वाढला आहे. बोरा म्हणतात की, सरकार ज्या डुकरांना ठार करणार त्याचा मोबदला मिळेल असं सांगितले जात आहे. पण कशाप्रकारे सरकार नुकसान भरपाई देईल याची कल्पना नाही. याआधीही अनेक पशुंचा मृत्यू झाला आहे, त्याचे पैसे मिळतील का नाही याची खात्री नाही. बोरा यांनी तीन वर्षापुर्वी वराह पालनाचा व्यवसाय सुरु केला होता. पण या आजारामुळे त्यांचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आसामच्या पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात राज्यातील शिवसागर, धामाजी, लखीमपूर, विश्वनाथ चरळी, दिब्रूगड आणि जोरहाट जिल्ह्यात आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा संसर्ग झाला. त्यानंतर संसर्ग झालेल्या डुकरांना ठार मारण्याची चर्चा सुरू आहे. पण पाच-सहा महिने उलटल्यानंतर पुन्हा एकदा दुर्गापूजनापूर्वी डुकरांना ठार मारण्याची चर्चा आहे.
दिब्रुगड जिल्ह्यातील खोवांगघाट येथे पिठूबर फार्म चालवणारे दिगांत सैकिया यांचीही अशीच परिस्थिती आहे. सैकिया यांचा वराह प्रजनन फार्म आहे. पण हा फार्म आधी कोविडमुळे बंद झाला नंतर आफ्रिकन स्वाइन फिव्हरमुळे बाजार बंद झाला. आमच्या भागात डुकरांची संख्या पाच ते सहा महिन्यांत वाढली, काहीतरी करुन आम्ही त्यांना खायला घातले. पण चार-पाच महिन्यांत डुकरांचा मृत्यू झाला.आमच्याकडे येथे २८२ डुक्कर होते, त्यापैकी दहा डुक्कर बाकी आहे. ते पण जगतील का नाही याची खात्री नाही. सैकिया यांचे या आजारामुळे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यापुढे कर्ज फेडण्याचा प्रश्न आहे.
वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थच्या म्हणण्यानुसार, आफ्रिकन स्वाइन ताप हा एक विषाणूजन्य आजार आहे जो घरगुती आणि वन्य डुकरांना प्रभावित करतो. हे जिवंत किंवा मृत डुक्कर किंवा डुकराच्या मांसद्वारे पसरला जाऊ शकतो. परंतु हा आजार प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरत नाही.आसामच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ. प्रदीप गोगोई म्हणतात हा एक नवीन रोग आहे आणि पहिल्यांदाच भारतात आला आहे. एनआयएचएसएडीने या आजाराची पुष्टी केली आहे. आतापर्यंत कोणतीही लस यावर आली नाही . ज्या डुकरांना संसर्ग झालेला नाही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
Published on: 16 October 2020, 04:49 IST