News

आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा 110 ते 119 टक्के पावसाचा आंदाज आहे. जास्ती पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी.

Updated on 22 May, 2025 1:45 PM IST

मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास शनिवार रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा 110 ते 119 टक्के पावसाचा आंदाज आहे. जास्ती पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी. राज्यातील सर्वच महानगरपालिकांनी फ्लॅश फ्लड सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. राज्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे. मुंबईत दरड प्रवण अशी एकूण 249 ठिकाणे आहेत. याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. आपत्तीकाळात बचावकार्यासाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याचे मॉकड्रिल घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी  दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आपण आपत्ती निवारणाचे काम करत आहोत. त्यामुळे त्याच त्या आपत्ती पुन्हा येणार नाहीत यासाठी दक्ष रहावे तसे नियोजन करावे. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाण्याच्या विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय ठेवावा. अशा समन्वयातून पुराचा धोका कमी करण्यास मदत होते. तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो अशा ठिकाणी रेशनचा अधिकचा साठा पुरवण्यात यावा. तसेच अशा भागातील गर्भवती महिलांना आपत्ती पुर्वीच सुरक्षित स्थळी अथवा रुग्णालयांमध्ये हलवण्यात यावे.

जेणेकरून कोणताही अवनस्थ प्रसंग उद्भवणार नाही. विद्युत विभागाने त्यांची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे, राज्यातील आपत्ती प्रवण भागांचे अद्ययावत नकाशे हवाई दलास द्यावेत, महानगरपालिकेने रस्त्यांची कामे करताना लावलेले आडथळे पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत, पश्चिम द्रृतगती मार्गावर ज्याठिकाणी पाणी साठते तेथे दक्षता घेण्यात यावी. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्यासाठी प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. सर्व महानगरपालिकांनी नाले सफाई करावी. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवावेत, मुंबईत दरड प्रवण भागात डोंगरकड्यांना जाळ्या बसवाव्यात, धोकादायक ठिकाणी फलक लावावेत, पोलिसांनी अशा ठिकाणी जाण्यापासून पर्यटकांना रोखावे अशा सूचना ही त्यांनी केल्या.

English Summary: Administration should be ready 24 hours for relief in case of disaster during monsoon CM Devendra Fadnavis orders
Published on: 22 May 2025, 01:45 IST