मुंबई: राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत देण्याबाबत प्रश्न सदस्य रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. भुसे बोलत होते.
श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगाम 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी 1.26 कोटी अर्जाद्वारे पीकविमा योजनेत भाग घेतला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये भाग घेतलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या क्षेत्राचे पंचनामे करुन अहवाल भारतीय कृषी विमा कंपनी व बजाज अलियान्झ कंपनीस पाठविण्यात आला असून विमा कंपनीकडून नुकसानीची परिगणना करण्याची कार्यवाही सुरु आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विमा कंपनीमार्फत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
केंद्र व राज्यस्तरावर नुकसानभरपाई निश्चित करण्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात आला व त्यानुसार संबंधित विमा कंपन्यांना नुकसान भरपाई अदा करण्याबाबत केंद्र शासनाच्या 11 फेब्रुवारी 2020 च्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या असून विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
राज्यातील ज्या 10 जिल्ह्यात विमा कंपनी पोहोचल्या नाहीत त्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन निधीच्या (NDRF) धर्तीवर मदत देण्यात येणार असल्याचेही श्री. भुसे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सदाभाऊ खोत, रणजीत पाटील, विनायक मेटे आदींनी सहभाग घेतला.
Published on: 28 February 2020, 07:49 IST