खरीप पेरणी झाल्यानंतर बळीराजा पिकांच्या वाढीसाठी शेतात युरिया टाकण्याच्या तयारीत आहे. यासाठी युरिया घेण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहे, परंतु यात शेतकऱ्यांची लुट केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सांगली जिल्ह्यात असलेल्या कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांकडून अधिकचा पैसा घेऊन लुट केली जात असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान कृषी विभागाने संबंधित कृषी केंद्रावर कारवाई केली आहे. जादा किंमती युरियाची विक्री होत असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली होती.
मिरजगाव येथील बिजंकूर या कृषी दुकानाच्या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात युरिया साठा जप्त केला. कायदेशीर कारवाई केल्याने शेतकरी वर्गातून कृषी विभागाचे कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील बिजंकुर कृषी सेवा केंद्र या शासनमान्य दुकानामधुन शेतकऱ्यांना जादा दराने युरिया खते विक्री केली जात होती. खरेदी केल्यानंतर त्यांना पक्के बिल न देता दुकानदार कच्ची बिल देतो,अशी तक्रार प्रमोद सुभाष जगताप राहणार सितपुर तालुका कर्जत येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे केली होती.यानंतर तालुका कृषी अधिकारी त्यांचे कर्मचारी आणि पंचायत समिती येथील कृषी गुण नियंत्रण अधिकारी यांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून संबंधित दुकानदारास रंगेहात पकडले. त्याच्यावर कारवाई करताना त्याचे युरिया विक्री बंद केली असून असलेला साठा जप्त करण्याची घटना दि. 7 जुलै रोजी घडली.
या कारवाईत तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर पंचायत समितीचे गुण नियंत्रक अधिकारी रूपचंद जगताप मंडल कृषी अधिकारी सोनाली हजारे कृषी पर्यवेक्षक प्रमोद काळदाते कृषी सहाय्यक श्याम माळशिकारे हे सहभागी झाले होते.यावेळी तक्रारदार शेतकरी प्रमोद जगताप डमी ग्राहक माऊली गौतम भवर ज्ञानेश्वर लवांडे अमित गायकवाड हे उपस्थित होते.
याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत तालुक्यातील सित पूर येथील प्रमोद सुभाष जगताप यांनी बिजंकुर या कृषी सेवा केंद्र दुकानांमधून युरिया खत खरेदी केले होते,मात्र संबंधित दुकानदाराने जादा पैसे घेतले आणि त्याची पावतीही शेतकऱ्यास दिली नाही.यामुळे जगताप यांनी या दुकानदाराची तक्रार तालुका कृषी विभाग यांच्याकडे केली.या तक्रारीच्या आधारे आज भरारी पथकाने डमी ग्राहक पाठवून तपासणी करून या दुकानांवर कारवाई केली.
Published on: 09 July 2020, 12:03 IST