आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात सगळीकडे वातावरण शिवमय झाले आहे. यामुळे आज फक्त राज्यातच नाही, तर देशभरात उत्सहाचे वातावरण आहे. अनेक शिवप्रेमी शिवज्योतीसाठी रायगडाच्या दिशेने वाटलाच करत आहे. असे असतानाच एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडाच्या दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटरसायकल २०० फुट दरीत कोसळली आहे. ही घटना सकाळी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. वरंध घाटात ही घटना घडली आहे.
हे तीन जण एकाच मोटरसायकलवर होते. रोडचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या तिघांनाही महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना ही घटना घडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिवजंयती साध्यापणाने साजरी करण्यात आली होती. पण यावेळी अधिक उत्साहाने शिवजयंती साजरी केली जात आहे. गड किल्यावर आज मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील झाली आहे.
हे तरुण अधिक उत्साहाने एकाच मोटरसायकलवरुन निघाले होते. त्यावेळी घाटात तिघेही दरीत कोसळले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. एकाला किरकोळ इजा झाली असून दोघांना तिथल्या ग्रामीण भागातील रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आलेले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. केतन देसाई, प्रथमेश गरुड, किरण सूर्यवंशी असे या तिन्ही तरुणांचे नावे आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले आहे.
दरम्यान, आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर अनेक कार्यक्रम होत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. कोरोनाच्या सावटानंतर सध्या अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे देखील घेतली जात आहेत. अनेक उपक्रम देखील हाती घेण्यात आले आहेत.
Published on: 19 February 2022, 03:01 IST