News

थळ आणि नवगाव येथे मच्छिमारांना बोटी बांधण्यासाठी जेट्टी बांधणे, खोदकाम करताना निघणाऱ्या दगडांचा वापर चॅनलच्या बाजूने बंधारा बांधण्यासाठी करणे,मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फटिलायझर्स कंपनीसह मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाने कार्यवाही करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

Updated on 25 February, 2021 12:15 PM IST

थळ आणि नवगाव येथे मच्छिमारांना बोटी बांधण्यासाठी जेट्टी बांधणे, खोदकाम करताना निघणाऱ्या दगडांचा वापर चॅनलच्या बाजूने बंधारा बांधण्यासाठी करणे,मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फटिलायझर्स (आरसीएफ) कंपनीसह मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाने कार्यवाही  करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या मच्छिमार बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिका-यांना अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मच्छिमार महिला आणि बांधवांच्या समस्या दूर करण्यासाठी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसाधनगृहे पावसाळ्यापुर्वी उभारणे आवश्यक आहे. ही फिरती किंवा तात्पुरती सार्वजनिक शौचालये तातडीने आठ दिवसात उभारावीत.

रसायनयुक्त सांडपाण्यामुळे प्रदुषण वाढून मासे मृत पावत असल्याचे स्थानिक आमदारांनी निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात सर्व्हे करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहे.

याचबरोबर बोटी बांधण्यासाठी जेट्टी उभारण्यासंदर्भात उपलब्ध निधीतुन आरसीएफ ने कार्यवाही सुरू करावी. नाविन्यपूर्ण कामासाठी निधीतून मच्छिमार बांधवांसाठी सुविधा पुरविण्याची कामे करता येतील का यासंदर्भात अहवाल सादर करावा. या परिसरातील प्रकल्पबाधितांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे अत्यावश्यक असल्याने या कामास गती द्यावी. मेरीटाईम बोर्ड आणि मत्स्यव्यवसाय विभागाने आपल्या विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या कामांना गती देऊन ती पूर्ण करावी असे निर्देशही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

 

 

बैठकीस विधानपरिषद सदस्य रमेश पाटील, विधानसभा सदस्य महेंद्र दळवी, मेरी टाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित सैनी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, आरसीएफचे अध्यक्ष श्रीनिवास मुडगेडीकर, मुख्य किनारा अभियंता रूपा गिरासे, आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

English Summary: Accelerate the process of providing facilities to the fishermen affected by the RCF project - Neelam Gorhe
Published on: 25 February 2021, 12:14 IST