परभणी: कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची क्षमता असुन कृषी अभियंत्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांसह इतर शेती कामासाठी लागणारी विविध यंत्रे व उपकरणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मारीको लिमिटेडचे विभाग प्रमुख (खाद्य नियंत्रण) तथा भारतीय खाद्य तंत्रज्ञान संघटनाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व समुपदेशन केंद्रामार्फत जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून दिनांक 16 ऑक्टोबर रोजी “कृषी उद्योगातील संधी व आव्हाने” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके हे होते तर कार्यक्रमास डॉ. गोपाळ शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. शाम गरुड आदीची उपस्थिती होती.
पुढे मार्गदर्शनात डॉ. हळदे यांनी भारतीय पारंपारिक खाद्य संस्कृती समोर ठेवून खाद्य प्रक्रिया यांत्रिकीकरणावर भर देण्याची गरज असल्याचे सांगुन कृषी विद्यापीठातील विद्यार्थांना त्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. चर्चेसत्रात विद्यार्थांच्या कृषी प्रक्रिया उद्योगाशी निगडीत प्रश्नांचे डॉ. प्रबोध हळदे यांनी निरसन केले. भाषणात प्राचार्य डॉ. उदय खोडके विद्यार्थ्यांनी आयुष्यात आपले ध्येय समोर ठेवून प्रामाणिकता व कठीण मेहनत, आत्मविश्वास जोपासल्यास ध्येय साध्य करणे कठीण नाही असे सांगितले.
सुत्रसंचालन डॉ. शाम गरुड यांनी केले तर प्रा. दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी तुकाराम चावण, ऋषिकेश होळकर, रोहित गायकवाड, प्रफुल्ल देशमुख, रोहन आरकडे, वरद आढाव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on: 19 October 2019, 08:21 IST