आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन रेल्वेगाड्यांची धडक होऊन मोठा अपघात झाला. विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजरने विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजरला पाठीमागून धडक दिली.प्राथमिक माहितीनुसार या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५० प्रवासी जखमी झाले आहेत. एएनआयने वृत्तसंस्थेला यासंदर्भातील विजयनगरमच्या एसपी दीपिका यांनी माहिती दिली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे अधिकार्यांना आरोग्य, पोलीस आणि महसूल यासह इतर सरकारी विभागांशी समन्वय साधून जखमी लोकांवर तातडीने वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने त्वरित मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
विशाखापट्टणम-रायगड ट्रेनने सिग्नल ओव्हरशूट केल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातामूळे सोमवारी एकूण १८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर २२ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे अधिकारी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न सूरू आहे असे पूर्व किनारपट्टी रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. ही आर्थिक मदत आंध्र प्रदेशातील लोकांसाठी आहे तसेच इतर राज्यातील अपघाताग्रस्तांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेशातील गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि इतर राज्यातील प्रवाशांना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी प्रत्येक मृताच्या कुटुंबासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, आणि जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
Published on: 30 October 2023, 11:05 IST