News

जुन्नर शहरातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोद्रे गावामध्ये २५ एकर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याने मढवलेले सुवर्णमंदिर उभारण्यात येणार आहे.

Updated on 30 September, 2023 4:07 PM IST

Pune News : हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी देणारे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे जुन्नर. याच शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहसनधारी सुवर्ण मंदिर, महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा व मागे स्वराज्याचा सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली आहे. आळेफाटा येथे आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये सोनवणे यांनी ही घोषणा केली.

जुन्नर शहरातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोद्रे गावामध्ये २५ एकर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याने मढवलेले सुवर्णमंदिर उभारण्यात येणार आहे. याच परिसरामध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच २०० फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून ८० मीटर उंचीचा स्वराज्याचा भगवा ध्वज देखील असणार अशी माहिती यावेळी शरद सोनवणे यांनी दिली.

हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार असून त्यासाठी जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगाला शिवरायांच्या या पुतळ्याची नोंद घ्यावी लागेल, असा हा पुतळा असेल असं यावेळी शरद सोनवणे म्हणाले.

पुढे बोलताना सोनवणे म्हणाले, संपूर्ण जगाला रयतेचे राज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या जुन्नर तालुक्यात महाराजांचे मोठे सुवर्णमंदिर आणि जगातील सर्वात उंच पुतळा उभारणे आपले कर्तव्य आहे. सुरुवातीला ही संकल्पना आपली स्वतःची असल्याने इतर कोणावरही आर्थिकभार न टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे "श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट" ( रजि - पुणे/0000/317/2023) ची स्थापना करण्यात आली आहे. शिवरायांचे भव्यदिव्य सुवर्ण मंदिर, पुतळ्यासह शिवकालीन इतिहास जागवणारे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असून संपूर्ण उभारणी आणि पुढे देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती यावेळी सोनवणे यांनी दिली.

गेली महिनाभरापासून सोनवणे आणि त्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडिया तसेच फ्लेक्सच्या माध्यमातून “सर्वात मोठी घोषणा होणार” हे वाक्य व्हायरल करण्यात येत होते. आज अखेर त्यांनी केलेल्या घोषणेने महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

२५ एकर क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मंदिराचा भव्यदिव्य प्रकल्प
सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या निसर्गसंपन्न गोद्रे गावामध्ये गावामध्ये शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लोकांच्या अस्मितेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रासाठी केलेल्या कामगिरीची सतत आठवण म्हणून महाराजांची किर्ती हि महाराष्ट्र राज्य, भारत देशापुरती मर्यादित न राहता जगामध्ये प्रसिध्द व्हावी, संपुर्ण जग हे शिवमय व्हावे यासाठी जगातील सर्वात मोठा भव्य असा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहसनधारी सुवर्ण मंदिर व महाराजांच्या भव्य पुतळ्यामागे स्वराज्याचा सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे.

शिवरायांचा हा मंदिर परिसर खुपच आकर्षक व प्रेरणादायी असणार आहे, यामध्ये शिवाजी महाराजांच्या आचार विचारांवर आधारित ग्रंथालय असणार आहे. छत्रपती महाराजांच्या जिवनावर आधारित चित्रफीत, लघुपट सभागृह असणार आहे, छप्पर नसलेली पायऱ्या पायऱ्यांनी वर खाली जाणारी एक गोलाकार जागा म्हणजे बदामी नाट्यगृह (AMPI Theater), मंदिराच्या चौहूबाजूंनी पाण्याचा प्रवाह व मंदिर परिसराच्या चौहूबाजूंनी शील तटबंदी असणार आहे, संपुर्ण परिसरामध्ये भारतीय प्रजातीची वातावरणाकुलीत आकर्षक वृक्ष असणार आहेत, मंदिराच्या सुरुवातीला भव्य असे महाद्वार असणार आहे

जनतेसाठी सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
जुन्नर तालुका आणि परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्द करून देण्यासाठी शरद सोनवणे यांच्या संकल्पातून सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हे हॉस्पिटल सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असणार असून माफक दरात रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती शरद सोनवणे यांनी दिली. यापुढे सर्व प्रकारच्या डॉक्टरांची फौज उभी करून सर्व पेशंटचा जीव वाचवू असा देखील निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

English Summary: A golden temple of Shiva Chhatrapati and the world largest statue will be erected pune news
Published on: 30 September 2023, 04:07 IST