गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसताना दिसत आहे, कधी अवकाळी कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट या साऱ्यांमुळे शेतकरी राजाचे मोठे नुकसान होत आहे. नैसर्गिक आपदा तर काही सांगून येत नाही परंतु सुलतानी संकटाने देखील शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडून ठेवले आहे. यावर्षी तर परिस्थिती ही खूपच भयावय झालेली दिसत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता त्यामुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांना त्याचा मोठा फटका बसला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात कवडीचेही उत्पन्न प्राप्त झाले नाही.
कसाबसा शेतकरी राजा यातून सावरत होता तर मध्यंतरी आता अवकाळीने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी राजांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. या आसमानी संकटाव्यतिरिक्त सुलतानी संकटे देखील शेतकऱ्यांना चांगलीच त्रासदायक सिद्ध होत आहेत. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथील एका शेतकऱ्याने लिंबाची बाग जेसीबी लावून उपटण्याची माहिती समोर आली आहे. बाभळगावचे शेतकरी अशोक मारूतराव गिराम यांनी आपल्या चार एकर क्षेत्रावरील लिंबाची बाग अक्षरशः जेसीबी लावून उपटून टाकली. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात गेल्या आठ ते दहा वर्षापासून लिंबाची लागवडी लक्षणीय बघायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात या शेतकऱ्यांना लिंबाच्या बागेतून चांगले उत्पन्न देखील प्राप्त होत होते, या शेतकऱ्यांना एकरी सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत होते मात्र, गेल्या काही वर्षांपासून लिंबाच्या बाजारभावात कमालीची घसरण बघायला मिळत आहे
लिंबाला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने लिंबाच्या बागांना जोपासण्यासाठी आलेला खर्च देखील आता शेतकऱ्यांना मिळत नाहीये. बाबळगाव चे अशोक यांनादेखील आता लिंबाची शेती परवडत नव्हती, त्यांनी चार एकर क्षेत्रात जवळपास 400 लिंबाच्या झाडांची लागवड केली होती.
सुरुवातीला त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत होते, मात्र गेल्या दोन वर्षापासून लिंबांना बाजारपेठेत घेऊन जायचा खर्च देखील निघत नव्हता. आलेला खर्च देखील लिंबाच्या बागेतून निघत नाही म्हणून अशोक यांनी जेसीबीच्या साह्याने चार एकरांवरील लिंबाची बाग उपटून टाकली.
Published on: 29 December 2021, 12:41 IST