ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये सर्वदूर अति पाऊस झाल्याने सगळीकडे पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासकीय पातळीवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात साधारणपणे ७४३ हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यासाठी शासनाकडे ९८ लाख २८ हजार ६५८ रुपयांच्या निधीची मागणी नोंदवण्यात आली आहे.
माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, सुंदर पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे, सभापती शोभा बर्के आदींनी पंचनामे तातडीने व्हावेत, यासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे त्यांच्याकडे मागणी केली होती. नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पंचनामे होत असताना सिन्नर तालुक्यात ते केले जात नव्हते. नांदुर-शिंगोटे त्याला एकाच तासात ८६ मिलिमीटर पाऊस नोंदला गेल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर सिन्नर तालुक्यात तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले.
हेही वाचा : रब्बी हंगाम : ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप
सुरुवातीला अवघ्या ७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे नोंद पंचायत समितीच्या आढावा बैठकीत कृषी विभागाने मांडली होती. हा अहवाल सभापती बरके आणि पंचायत समितीचे उपसभापती कातकाडे यांनी फेटाळून लावत नुकसान झालेले शेतकरी पंचनामे पासून वंचित राहू नये, यासाठी गावनिहाय पाहणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पंचनामे करण्यासाठी आणखी वेग आला. या बाबतीत शासन निर्णयानुसार तेथील टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. सिन्नर तालुक्यातील जवळ जवळ ३० गावातील ९५५ शेतकऱ्यांचे ७४३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार ९८ लाख २८ हजार ६५८ रुपये निधीची गरज असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
Published on: 05 November 2020, 05:41 IST