सोलापूर जिल्ह्यातून 88 वर्षीय शेतकरी आजीबाईंची आपल्या पिकाची जोपासना करण्यासाठीची धडपड समोर येत आहे. या समवेतच महावितरणचा निर्दयी कारभार देखील प्रश्नांच्या चौकटीत असल्याचे बघायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील पिके जोमदार वाढीत आहेत. जिल्ह्यातील माढा तालुक्यात देखील रब्बी हंगामातील पिके याच अवस्थेत बघायला मिळत आहेत. सध्या राज्यात सर्वत्र कडाक्याचे ऊन पडत असल्याने पिकांना पाण्याची अतोनात आवश्यकता भासू लागली आहे. मात्र, अशा नाजूक प्रसंगी महावितरणचा निर्दयी कारभार उजागर झाला आहे. महावितरणने माढा तालुक्यातील चव्हाणवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे.
तालुक्यातील चव्हाण वाडी येथील सुभद्राबाई 88 वर्षाच्या आहेत, या वयात त्या शेती करतात. चव्हाणवाडी शिवारात महावितरण विद्युत पुरवठा खंडित केल्याने रब्बी हंगामातील पिके करपत आहेत. एकीकडे वाढते ऊन आणि पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने रब्बी हंगामातील पिके जागीच जळत आहेत. आजीबाईंनी आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना डोळ्यादेखत करपताना बघितले असल्याने डोळ्यादेखत पिक जळाल्याने किती वेदना होतात याचा पाढाच महावितरणच्या निर्दयी अधिकाऱ्यांपुढे वाचला आहे. रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या मायेने जोपासले आणि आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना केवळ विद्युत पुरवठा नसल्याने पिके जळत असतील तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी आणि शेतीच केली नाही तर जगायचं कसं असा हृदयस्पर्शी सवाल आजीबाईने यावेळी उपस्थित केला. आजीबाईंच्या या टाहोमुळे चव्हाणवाडी शिवारातील बांधावरची परिस्थिती राज्यातील सर्व जनतेच्या पुढ्यात उभी झाली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतीच आणि शेतकऱ्याच पिता पुत्रा सारखं नातं काय समजणार? असे यावेळी आजीबाईंचे मत होते. महावितरण जरी नियमावर बोट ठेवून कारवाई करत असले तरी यामुळे शेतकऱ्यांचा जीव जाणार हे अटळ असल्याचे म्हणताच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तसेच अधिकाऱ्यांमध्ये मोठी भयान शांतता बघायला मिळाली. बांधावरची सत्यपरिस्थिती आजीबाईद्वारे कथन केली जात होती आणि आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी आणि ज्यांच्यामुळे आंदोलन उभे झाले ते महावितरण व त्यांचे अधिकारी मौन धारण करीत आजीबाईंची नव्हे-नव्हे तर संपूर्ण शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेत होते.
नियमांवर बोट ठेवता मग ही अनियमितता कशी
एकीकडे, शेतकऱ्यांची थकबाकी बघता महावितरणकडून नियमांवर बोट ठेवत विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे तर दुसरीकडे नियमांचे पालन करणारे महावितरण आपल्या भोंगळ्या कारभारावर एक शब्द देखील बोलायला तयार नाही. या आजीबाईंनी कनेक्शनसाठी महावितरण कडे कोटेशन जमा केले आहे, तरीदेखील आजीबाईंना अद्यापही वीज जोडणी करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे महावितरणचे दुटप्पी धोरण यावेळी सर्वांसमोर उघड झाले. एकंदरीत महावितरणच्या या निर्दयी तसेच भोंगळ कारभारामुळे अन्नदात्याचे जगणं हलाखीचे झाले आहे.
आंदोलन का आणि कशे
गेल्या काही दिवसांपासून चव्हाणवाडी व शिवारात महावितरणकडून नियमित विद्युत पुरवठा दिला जात नाहीये. महावितरणच्या या कारभारामुळे रब्बी हंगामातील तसेच शिवारातील मुख्य पीक उसाचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट घडून येणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांनी टेंभुर्णी स्थित महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. संजय पाटील भीमानगरकर यांच्या दिशानिर्देशना खाली आंदोलन करण्यात आले, आंदोलन ठिय्या स्वरूपाचे असून यावेळी कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले.
शेतकरी आणि महावितरण यांच्यातील संघर्ष
गेल्या काही दिवसांपासून या शिवारात नियमित विद्युत पुरवठा दिला जात नाही तसेच वाढत्या थकबाकीमुळे अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांना देखील मोठा फटका बसला होता, खरीप हंगामातील पिके तर शेतकऱ्यांच्या हातातून पुरते वाया गेलेत कसेबसे रब्बी हंगामातील पिकांना शेतकरी राजा जगवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि यातून चार पैसे हाताला येतील अशी आशा बाळगून आहे. मात्र आता महावितरणच्या या कारवाईमुळे शिवारातील रब्बी हंगामाचे तसेच मुख्य पीक उसाचे मोठे नुकसान होत आहे. आजीबाईंच्या या हृदयस्पर्शी टाहो नंतर महावितरण आपल्या निर्णयावर पुनर्विचार करतो की नाही आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागतो की नाही हे विशेष पाहण्यासारखे असेल.
Published on: 04 March 2022, 02:55 IST