वाळूच्या बाबतीत राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आणि त्यानंतर आता वाळूची विक्री राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाळूचे वाढलेले प्रचंड दर आणि होणारी वाळूची तस्करी या बाबींना अडकाव व्हावा तसेच सामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी याकरिता हे धोरण प्रामुख्याने तयार करण्यात आलेले आहे. याच अनुषंगाने आता राज्यामध्ये सुमारे 65 वाळू डेपो तयार करण्यात आले असून ज्या कुणाला वाळू खरेदी करायची असेल असे व्यक्ती महा खनिज संकेतस्थळावरून थेट वाळूची खरेदी करू शकणार आहेत.
राज्यामध्ये 65 वाळू डेपो तयार
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी याकरिता राज्यात नवे वाळू धोरण जाहीर केले व त्यानंतर आता राज्यात 65 वाळू डेपो तयार करण्यात आलेले आहेत. या डेपोच्या माध्यमातून कुणाला वाळू खरेदी करायची असेल तर ते महाखनिज या वेबसाईटवरून वाळूची खरेदी करू शकणार आहेत.
विशेष म्हणजे वाहतूक करण्यासाठी जो काही ट्रक लागेल त्याची ऑनलाईन बुकिंग देखील आता करता येणार आहे. या नवीन वाळू धरणानुसार आता सहाशे रुपये ब्रास या दराने नागरिकांना वाळू मिळणार आहे. या 65 वाळू डेपो मध्ये सर्वात जास्त वाळू डेपो नागपूर विभागात असून नागपूर विभागातील सोळा तालुक्यांमध्ये हे डेपो तयार करण्यात आलेले आहेत.
वाहतुकीसाठी ट्रक देखील उपलब्ध
राज्य सरकारने महाखनिज या संकेतस्थळावरून वाळू विक्री उपलब्ध करून दिली असून यावर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हव्या त्या ठिकाणाच्या वाळूची खरेदी करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे त्या वाळूची वाहतूक करण्यासाठी ट्रक देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या प्रक्रियेमध्ये तुम्ही जेव्हा वाळू खरेदी कराल तेव्हा संबंधित ट्रकचा क्रमांक तुम्ही निवडल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याच ट्रकच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच वाळू मिळेल. यामध्ये ट्रकचे भाडे हे संबंधित मालकाशी बोलल्यानंतर व भाडे दिल्यानंतर ही वाळू वाहतूक करून मिळते. महा खनिज अँप वर दररोज निर्माण होणारी व विक्री होणारी वाळूची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना देखील या संकेतस्थळाचा खूप मोठा फायदा होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील किती तालुक्यात आहेत वाळु डेपो?
1- पुणे जिल्हा- पुणे जिल्ह्यामध्ये 18 वाळू डेपो असून ते नऊ तालुक्यात आहेत.
2- नागपुर जिल्हा- नागपूर जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये एकूण 35 वाळू डेपो उभारण्यात आलेले आहेत.
3- अमरावती जिल्हा- अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये चार वाळू डेपो उभारण्यात आलेले आहेत.
4- छत्रपती संभाजी नगर- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आठ वाळू डेपो उभारण्यात आलेले आहेत.
अशाप्रकारे राज्यातील एकूण 36 तालुक्यांमध्ये 65 वाळू डेपो उभारण्यात आलेले आहेत.
Published on: 15 August 2023, 01:25 IST