१) दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी योजना सुरु
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत ७० हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत. राज्यात सध्या ७० हजार लाभार्थ्यांना ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसायाकरिता वितरीत केले आहे. यापैकी ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्भूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरवात करण्यात येत असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
२) हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन १० दिवसांत आटोपले जाण्याची शक्यता आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
३) मान्सून परल्यानंतर देशात थंडीची चाहूल
देशातून मान्सून परतल्यानंतर थंडीला आता सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीत पुढील दोन दिवस हलके धुके राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच हवामान खात्याने पुढील दोन दिवस केरळमध्ये पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. आज राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
४) मनरेगा जॉबकार्ड आधारशी लिंक करण्याचा घोटाळा उघडकीस
पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मनरेगाच्या नावाखाली बनावट जॉब कार्ड वापरून पैसे घेणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जॉबकार्ड आधारशी लिंक करण्याचा मोठा घोटाळा देशभरात उघडकीस आला आहे, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी दिली आहे. पश्चिम बंगाल पाठोपाठ महाराष्ट्रातही असाच घोटाळा उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बनावट जॉब कार्ड वापणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
५) मराठवाड्यातील पाण्याची चिंता लवकरच मिटणार
कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाला गती मिळणार असल्याने मराठवाड्यातील पाण्याची चिंता लवकरच मिटणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आहे. तसंच कोल्हापूर सांगलीत येणाऱ्या महापुरातील वाहून जाणारे ५१ टीएमसी पाणी मराठवाड्यासह दुष्काळी भागाला मिळणार अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
Published on: 21 October 2023, 04:43 IST