महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 28 डिसेंबर 2019 ला कर्जमाफीचा आदेश देखील निघाला.
त्यानुसार 7422 कोटी रुपयांची कर्जमाफी मराठवाड्याला, त्याखालोखाल पाच हजार 384 कोटी कर्जमाफी विदर्भाला मिळाली. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला 2817 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली. परंतु आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ 31 लाख 81 हजार 178 शेतकऱ्यांना मिळाला आहे. या एकूण शेतकऱ्यांना 20 हजार 290 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून अजूनही 35 हजार 629 शेतकऱ्यांना 156 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळू शकलेली नाही.
त्यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु अशा शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या शेवटच्या कर्जाच्या काही विशिष्ट टक्के रक्कम किंवा कमाल 50 हजार रुपये प्रोत्साहनपर द्यावेत अशा दोन पर्यायांचा विचार सरकार करीत आहे.
लवकरच या बाबतीत काही निश्चित धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देण्यात आले होते.अर्थसंकल्पीय अधिवेशनातच याबाबतची घोषणा होईल तोवर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागेल अशी परिस्थिती आहे.
Published on: 29 January 2022, 12:37 IST