देशातील कोरोना बाधितांची संख्या 33 हजार 184 झाली आहे. गुरुवारी राजस्थानात 86, पश्चिम बंगामध्ये 33 आणि ओडिशामध्ये 3 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याआधी बुधवारी देशभरात 1702 रुग्णांची नोंद झाली. तर 690 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. याआधी 21 एप्रिल रोजी 703 रुग्ण बरे झाले होते. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. 33 हजार रुग्णांपैकी 23,651 सक्रिय प्रकरणे आहेत.
दरम्यान राज्यातील रुग्णांची संख्या 9,915 झाली आहे. राज्यात बुधवारी 597 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 25 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 9,915 वर पोहोचला. एकूण मृतांची संख्या 432 वर गेली आहे. बुधवारी एकाच दिवसात 205 रुग्ण बरे झाले. राज्यात आजवर एकूण 1,593 रुग्ण बरे होऊन घरी परतले. लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक घरी परतणार आहेत, अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून राज्यातून बाहेर जाणारे आणि बाहेरच्या राज्यातून परत येणारे यासाठी प्रवास करणाऱ्या सर्वांचा समनव्य ठेवण्याची जबाबदारी तीन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील.
मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व आणि जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे, निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातून बाहेर जाणारे आणि बाहेरच्या राज्यातून परत येणारे यासाठी प्रवास करणाऱ्या सर्वांचा समनव्य ठेवण्याची जबाबदारी मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
Published on: 30 April 2020, 04:13 IST