एकाच व्यवसायाशी आणि घटकांचे निगडीत असलेल्या उद्योगांना एकत्र आणून कापूस ते कापड या प्रक्रियेचे चक्र अकोला जिल्ह्यात गतिमान करण्यात आले आहे.
यामध्ये अकोला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्या संबंधित 27 उद्योगांचे एकत्रीकरण दि संघा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट असोसिएशन अकोला या नावाने तयार करण्यात आले असून यामधून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करण्यात आली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्याची ओळख हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून असे आहे.त्याचे कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी या संकल्पनेतून या जिल्ह्यात एक गाव एक उत्पादन हे रूप देऊन पालकमंत्री बच्चू कडू यांनी चालना दिली त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कापूस प्रक्रिया करणाऱ्या एककाना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे दि संघा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट असोसिएशन अकोला या उद्योग समूहाचे एकत्रीकरण करण्यात आले.सूक्ष्म व लघु उद्योग एकक विकास कार्यक्रमात हे क्लस्टर विकसित करण्यात आले. प्रत्येकी पन्नास लाख रुपये भांडवलातून युनिट्स उभी राहिली आहेत.
या उद्योगामध्ये कापसाच्या गाठी बनवणे,त्याचे धागे व या धाग्यांना आवश्यकते नुसार रंगविणे,धाग्याचा कापड बनवणे आणि कापडाचे परिधान बनवणे अशा सर्व प्रक्रिया केल्या जातात. याठिकाणी दिवसाला अडीच टन कापसाची प्रक्रिया या ठिकाणी होते.
या ठिकाणी सहाशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून या ठिकाणी चालू स्थितीत एकशे दहा कर्मचारी काम करतात.येथे प्रत्येक उद्योगाला 50 लाख रुपये भांडवल असे मिळून साडेतेरा कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा उद्योग केंद्राच्या शिफारशीनुसार युनियन बॅंकेने दिले आहे. याशिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्रे या युनिटला अनुदानावर मंजूर झाले आहेत.
Published on: 04 February 2022, 07:43 IST