राज्यात गेल्या दोन- तीन दिवासांपासून जोरदार पाऊस होत आहे. गुलाब चक्रीवाळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणवत आहे. याचा परिणाम मराठवाड्यात दिसत आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान मंत्रिमंडळाकडून या नुकासानीचा आढावा घेण्यात येत आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा : नियम,निकष न लावता नुकसानग्रस्तांना मदत मिळावी--विनायक सरनाईक
“पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरे वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत”, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचे पॅकेजचे वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.
Published on: 29 September 2021, 09:04 IST