देशाच्या सीमेवरील जवानासारखा शेतकरी देखील कायम जीव मुठीत घेऊन जगाला अन्नधान्य पुरवायचा प्रयत्न करत असतो. शेती करत असताना अनेक धोक्यांची टांगती तलवार शेतकऱ्याच्या डोक्यावर लटकत असते. साप, विंचवा सारख्या प्राण्याचा दंश होणे, कृषी पंप हाताळताना विद्युत तारांचा धक्का लागणे, पावसाळ्यात वीज अंगावर पडणे तसेच पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू होणे अशा विविध घटना शेतकऱ्याच्या बाबतीत सातत्याने घडण्याची शक्यता असते. परिणामी कुटुंब प्रमुख दगावला जाऊन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न थांबून उर्वरित कुटुंब उघड्यावर पडते.
मात्र, अशा कोणत्याही घटनेने शेतकरी दगावल्यास अथवा एखाद्या अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास शासना तर्फे २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा यांच्या नावाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. परंतू अनेक शेतकऱ्यांना ही योजना माहित नसल्याचे समोर आले आहे. रस्ता किवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विजेचा धक्का बसून, वीज पडून मृत्यू , कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा होऊन मृत्यू , उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प व विचू दश, हिस्त्र जनावरांचा हल्ला, जनावरांनी चावल्यास किंवा खाल्ल्यास मृत्यू झाला तर हे विमा संरक्षण दिले जाते विम्याचा लाभ हा १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना विमा छत्र देण्यासाठी सुधारित स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे.
या लाभासाठी योग्य कागदपत्रांसह अर्ज अनिवार्य असून सहायक कृषी अधिकारी यांना माहिती देणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या अपघात संदर्भातील कागदोपत्री नोंदी करून वैद्यकीय अहवाल, पोलीस पंचनामा, स्थळ पंचनामा आदी गोष्टींसह शेतकऱ्यांनी अर्ज करणे अनिवार्य आहे. विमाछत्र कुटुंबातील शेतकऱ्यांचे आई-वडील, पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश आहे. तर अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये भरपाई दिली जाते.
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाई मिळते. नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थाच्या नशेतून अपघात, स्त्रियाचा बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध सैन्यातील नोकरी आदी घटनाचा या विमा संरक्षणात समावेश नाही .
सन २०१५-१६ मध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमांतून किमान एक लाख व कमाल दोन लाखापर्यंत निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या विम्यासाठी कोणताही हप्ता भरण्याची गरज शेतकऱ्यांना नाही. ती शासनाची योजना असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना थेट मिळणार आहे. कारण सरकार शेतकऱ्यांच्या वतीने विमा कंपनीकडे पैसे भरते. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या संदर्भात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? सोयाबीनच्या दरात झाली मोठी घसरण
Breaking: 'या' राज्यात वाढले दुधाचे दर; दूध उत्पादकांना मिळणार दिलासा
ऐकावं तेवढं नवलंच! या इसमाने तयार केला 'इको फ्रेंडली टी पॅक', आता चहाच्या पाकिटातूनही रोप उगवेल
Published on: 01 May 2022, 06:29 IST